आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फीच्या नादात अाठ महिन्यांची गर्भवती 150 फूट दरीत पडली, बाळासह बचावली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सिंहगडावर सेल्फी घेताना आठ महिन्यांची गर्भवती महिला १५० फूट खाली कोसळल्याची घटना रविवारी घडली. सुदैवाने यातून ती बचावली. दरड काेसळल्यामुळे सिंहगडावर काही दिवसांसाठी पर्यटकांना मनाई आहे. तरीही प्रणिता लहू इंगळे (२८, लातूर) या पती व भावासह सिंहगडावर गेल्या होत्या. तानाजी कड्याजवळ प्रणिता फोटो काढत होती. या कड्याला रेलिंग आहे. मात्र, पावसामुळे हा भाग निसरडा झाला आहे. त्यामुळे सेल्फी घेताना पाय घसरून ती दीडशे फूट दरीत कोसळली. तेव्हा पती व भावाने अारडाअाेरड करून मदतीची याचना केली. ग्रामपंचायत सदस्य (घेरा सिंहगड) अमोल पढेर आणि कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. 

प्रणिताला वाचवण्यासाठी अमाेल व त्यांच्या सहकाऱ्याने दरीत उतरण्याचा निर्णय घेतला. सुमारे पावणेदोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर तिला सुखरूप बाहेर काढण्यात या दाेघांना यश अाले. दरडी कोसळत असल्याने सध्या सिंहगडावर पर्यटकांना बंदी आहे. प्रणितासह तिघे गडाखाली अतकरवाडी येथे त्यांची कार उभी करून पायवाटेने गडावर पोहाेचल्याचे समजते. प्रणिता यांची २५ ऑगस्ट ही प्रसूतीची संभाव्य तारीख आहे. अशा शारीरिक अवस्थेतही त्या सुमारे साडेतीन किलोमीटर अंतर चढून गडावर पोहाेचल्या होत्या, अशीही माहिती मिळाली.

दरम्यान, ‘मी सुखरूप पोहाेचले. बाळ आणि मी व्यवस्थित आहोत’ असे सांगणारा दूरध्वनी प्रणिता यांनी त्या लातूरला घरी पोहाेचताच अमोल पढेर यांच्याकडे केला. संकटात सापडलेल्या बहिणीची तुम्ही मदत केली, असे सांगून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

लातूरच्या प्रणिता गवतावर पडल्या, पाठीवरून घसरल्या
‘प्रणिता ज्या ठिकाणी पडल्या त्या भागात सुदैवाने भरपूर गवत वाढले होते आणि दगड वा खडक नव्हते. उताराच्या बाजूने त्या पाठीच्या बाजूकडून घसरत गेल्या, त्यामुळे त्यांच्या पोटातल्या बाळालाही इजा झाली नाही. मात्र त्या जिथे पडल्या तिथून फक्त दोन-फूट अंतरावर दुसरा कडा होता आणि तो सत्तर फूट खाली झेपावणारा होता. मात्र नशीब चांगले म्हणून त्याअाधीच प्रणिता यांना वाचवण्यात यश अाले. गंभीर इजा न होता, किरकोळ जखमांवर निभावले’, असे अमोल पढेर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
पुढील स्लाइडवर वाचा..फोटो क्लिक करताना प्रणिताचा पाय घसरला...
बातम्या आणखी आहेत...