पुणे- पुण्यातील कोथरुड परिसरातील किष्किंदानगरमध्ये पार्किंग करण्यात आलेल्या आठ दुचाकी आज पहाटे अज्ञातांनी जळाल्याची घटना उघडकीस आली आहे. पहाटे 2 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत सर्व वाहने जळून खाक झाली आहेत. दरम्यान, पुण्यात वाहने जाळल्याची गेल्या महिन्याभरातील ही चौथी घटना आहे. ही वाहने नेमके कोण पेटवतेय यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत तर पोलिस प्रशासन हतबल झाले आहे.
मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे कोथरूडमधील किष्किंदानगर परिसरात पार्किंगमध्ये वाहने लावली होती. मात्र, मध्यरात्री दोनच्या सुमारास तेथून धूर येऊ लागला. काही वेळातच आगीने रूद्र रूप धारण केले त्यामुळे रहिवाशांत एकच गोंधळ उडाला. रहिवाश्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सर्व दुचाकी जळून खाक झाल्या.
नागरिकांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. त्यानंतर कोथरूडचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या आगीप्रकरणी अद्याप धागेदोरे लागले नाहीत. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.
महिन्याभरात पुण्यात चार घटना, 40 वाहने खाक-
23 मार्च- धायरीतील डीएसके सोसायटीतील एका बिल्डिंगमध्ये 15 दुचाक्या पेटवून दिल्या.
25 मार्च- एरंडवणेतील राजमयुर सोसायटीतील 9 दुचाक्या पेटवून दिल्या होत्या. यातील पाच गाडया जाळल्या होत्या तर चार गाडयांना आगीची झळ लागली होती.
29 मार्च- कात्रजमधील गणेश पार्क सोसायटीत 3 कार तर 15 दुचाक्या पेटवून दिल्या.
6 एप्रिल- कोथरूडमधील किष्किंदानगर परिसरात पार्किंगमध्ये लावलेली 8 दुचाक्या पेटवून दिल्या. मागील महिन्याभरात चारदा घटना घडल्या असून सुमारे 40 गाड्यांचे नुकसान झाले आहे.