आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 87 Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan Chairman Decided On 16 Oct

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

87 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची 16 ऑक्टोबरला होणार निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - 87 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मुकुट कुणाच्या मस्तकी विराजमान होणार, याचा निर्णय 16 ऑक्टोबरला होणार आहे. यंदाचे संमेलन सासवड येथे डिसेंबर किंवा जानेवारीत आयोजित केले जाईल, असे साहित्य महामंडळाने बुधवारी जाहीर केले.

साहित्य महामंडळाच्या वतीने येथे संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, निवडणूक अधिकारी अँड. प्रमोद आडकर, महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन या वेळी उपस्थित होते.

निवडणूक अधिकारी अँड. आडकर म्हणाले, महामंडळाच्या घटक, समाविष्ट, संलग्न, निमंत्रक संस्थांकडून मतदारांच्या याद्या महामंडळाकडे दाखल असून, 11 ऑगस्ट रोजी याद्या सुपूर्द केल्या जातील. 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी नावे सुचवण्याची मुदत आहे. नाव मागे घेण्याची मुदत 24 ऑगस्ट आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास कोण उत्सुक आहेत, हे 24 ऑगस्टला स्पष्ट होईल.

मतपत्रिका 4 सप्टेंबरपासून
महामंडळाच्या चार घटक संस्था, स्वागत समिती, संलग्न संस्था, पूर्वाध्यक्ष, महाकोशाचे विश्वस्त हे मतदार असतील. मतपत्रिका टपालाद्वारे मतदारांकडे पाठवण्याची मुदत 4 सप्टेंबर असून, त्या मतपत्रिका पुन्हा महामंडळाकडे पोहोचण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर आहे. 16 ऑक्टोबरला मतमोजणी पूर्ण करून नियोजित संमेलनाध्यक्षांचे नाव जाहीर केले जाईल.


निवडणूक बंधनकारक
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने दिले जावे, या मताशी वैयक्तिकरीत्या सहमती असली, तरी महामंडळ हे घटनेला बांधील आहे. त्यामुळे घटनेनुसार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार आज हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले.