आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 87th Marathi Sahitya Samelaan Kumar Ketkar On Narendra Modi & Narendra Dabholkar

साहित्य संमेलन : फ. मु. शिंदेंचा हृदयसंवाद अन् मुक्तचिंतन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सासवड (पुणे)- साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा फ.मुं. शिंदे यांनी लिखीत भाषण करणार नसल्याचे सांगत भूमिका मांडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे साहित्यरसिकांना त्यांच्या भाषणाविषयी उत्सुकता होती; परंतु एकंदर भाषणाने त्यांचा हिरमोड केला असला तरी त्यांच्या हृदयसंवाद अन् मुक्तचिंतनाच्या चौफेर फटकेबाजीने कवी हा असाच असतो हे दाखवून दिले.
पुढे वाचा, फ. मु.च्या भाषणादरम्यान त्यांनी साधलेला हृदयसंवाद अन् मुक्तचिंतन
...या जगाची त्या जगाला ओढ राहिली नाही
जिभेच्या द्वेषापोटी साखर गोड राहिली नाही (टाळ्या)
निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात झाल्यानंतर एक प्रतिक्रिया आली की लोकप्रियता जिंकली आणि अंतर्मुखता हरली. यावर माझे मत असे की, जोपर्यंत तुम्ही अंतर्मुख करणारे लिहित नाही तोवर तुम्ही लोकप्रियच होत नाही.
मराठवाड्याचा दुष्काळ :
मराठवाड्यातील भीषण दुष्काळ पाहिल्याचाही माझ्यावर परिणाम झाला. मराठवाड्यात पाऊस का पडत नाही, हे सांगण्यासाठी फ.मुंनी कवितेचा आधार घेतला. ते म्हणाले...
‘नेत्या पुढा-यासारखीच गत पावसाची झाली,
सारा समुद्र पिऊन सर बारकीच आली’ (प्रचंड टाळ्या).
गरीबीतून दु:खाजवळ राहण्याची श्रीमंती मिळते : बालपण गरीबीत गेले. पण गरीबीचाही गर्व ठेवला पाहिजे. गरीबीतून दु:खाजवळ राहण्याची श्रीमंती मिळते, असे फ.मुं म्हणाले.
‘मी गोसावी दारोदारी सुखे मागत फिरतो आहे
दार असे सापडले नाही जिथे दु:ख भेटले नाही’
असे सांगून त्यांनी दु:खाची व्यापकता व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, कोणताही प्रकोप मग तो नैसर्गिक असो की मानवनिर्मित या प्रकोपामुळे मी हादरून जातो. माझ्या वेदना मी शब्दातून मांडतो. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनावेळी दलितांवर अत्याचार झाले. त्यावेळी मी लिहिले -
भजनातून आली चिरकत भीती
टाळांनीच रगडली टाळांची नाती
रात्रीचे संत जाहले पहाटेस वैरी
अभंग ओकले बंदुकीच्या फैरी (सुन्न शांतता)
मुक्तचिंतन : कवि फ. मुं. शिंदे यांनी त्यांच्या मुक्तचिंतनाचा शेवट कवितेच्या माध्यमातूनच केला. कवी आत्मचरित्र लिहित नाही. कविता हेच त्याचे आत्मकथन असते असे सांगून ते म्हणाले -
मी आयुष्य माझे इथे तिथे वाटत आलो
शिलाईतच जणू जागोजागी फाटत आलो
वाटले नव्हते होतील झरेही पारखे
जलाशयात माझ्याच कसा मी आटत आलो
का धरला अबोला सुखांनी कळते मलाही
मखरात माझ्या मी दु:खांना थाटत आलो.
जन्मता जन्मता वारले वासरूही कसे
गायीसारखाच मी मरणाला चाटत आलो.
फमुंची काव्यकथा
चिंतन । बालपण गरिबीत गेले. पण गरिबीचाही गर्व ठेवला पाहिजे. गरिबीतून दु:खाजवळ राहण्याची श्रीमंती मिळते.
मराठी । माणूस जिवंत आहे, गरिबी आहे आणि वारकरी आहेत तोवर मराठीची चिंता करण्याची गरज नाही.
रसिक । जे लिहित नाहीत त्यांच्याकडे भाषेचे वैविध्य असते. म्हणूनच तर तुम्ही आमच्यावर प्रेम करता.
चौफेर फटकेबाजी
1. या संमेलनात वाद कोणालाही अनुभवता आला नाही. वाद करायचाच नव्हता, तर मगं संमेलन घेतले कशाला...! संगीतात आणि संगतीत संवादी असला की वाद उद्भवतच नाही. उरात आणि सुरात ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
2. संमेलनाचा बॅज लावण्यासाठी आले तेव्हा मी डाव्या बाजूला न लावता तो उजव्या बाजूला लावण्यास सांगितले. हृदयाचा सत्कार तर सगळेच करतात. लिव्हरचा सत्कार मात्र कवीच करू शकतो.
3. संमेलनाध्यक्ष झालो तेव्हा लोकप्रियता जिंकली, अंतर्मुखता हरली अशी प्रतिक्रिया उमटली. त्यावर मी म्हणालो, अंतर्मुख करणारे लिहिणार नाहीत तोवर लोकप्रिय होताच येणार नाही.
4. आमच्या प्रदेशात खूप वेळच वेळ असतो. मी तर म्हणतो की, मराठवाडा ही जशी संतांची भूमी आहे तशीच उसंतांचीही भूमी आहे.
5. रस्त्यातले खड्डे हा काय प्रकार आहे. या मुद्द्यावर तर निवडणुकाही होतात. परदेशातील लोक जेव्हा हे रस्ते पाहतात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते. काय प्रगत तंत्रज्ञान आहे पाहा, खड्ड्याला खड्डे जोडून इकडे रस्ते केले जातात, असे त्यांना वाटते.
6. साहित्य चळवळीच्या प्रसारासाठी मला महामंडळाकडून एक लाख निधी देण्यात आला; पण गेली 40 वर्षे मी आणि रामदास फुटाणे हेच तर करतो आहोत. मग त्या 40 लाखांचे काय?
7. पवारसाहेबांचे माझ्यावर 1970 पासून प्रेम आहे. 70 मधले हे प्रेम सत्तरीत आल्यानंतरही कायम आहे.