आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 89th Marathi Literary Meet At Pimpri Chinchwad In Pune

साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बळकट करा -शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संबोधित करताना शरद पवार. - Divya Marathi
संबोधित करताना शरद पवार.
(फोटो सौजन्य- सह्याद्री वाहिनी)
ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी, पिंपरी-चिंचवड (पुणे)- साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीत माझा हात होता अशी अफवा पसरली होती. महाराष्ट्रात काहीही झाले तरी माझा त्यात हात होता असे सांगण्याची पद्धत आता रुढ झाली आहे. लातूर किंवा कोयनेत भूकंप झाला तरी माझे नाव घेतले जाईल की काय अशी परिस्थिती आहे. सबनिस यांची निवड झाल्यानंतर मी आयुष्यात पहिल्यांदा त्यांना भेटलो. त्यामुळे या केवळ चर्चाच होत्या. पण अशा प्रकारच्या चर्चा बंद करायच्या असतील तर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अधिक बळकट करावी लागेल, असे मत माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की साहित्य संमेलनाचे पावित्र्य राखले जावे. समाजात उभारी आणायची असेल तर सकारात्मक विचार करायला हवा. नकारात्मक प्रसिद्धीच्या बळावर समाज घडायला नको. मराठी साहित्य संमेलनाने भौगोलिक सीमा पार केल्या आहेत. आता मराठी साहित्यानेही या सीमा ओलांडायला हव्यात. मराठी साहित्य खऱ्या अर्थाने वैश्विक व्हायला हवे. आपल्या साहित्यात तेवढी क्षमता आहे. मराठी साहित्याचा ठरा देश-विदेशात उमटायला हवा. वर्षभरात राज्यभर अनेक साहित्य संमेलन घेतले जातात. आता ट्विटरवरही एका साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. या माध्यमातून तरुण पिढीलाही साहित्याशी जोडले जात आहे.
असहिष्णूता या विषयावर बोलताना फडणवीस म्हणाले, की भारत देश सहिष्णू होता, आहे आणि भविष्यातही राहिल. भारताने याची शिकवण जगाला दिली आहे. विवेकानंद यांनी जागतिक मंचावर हे विचार अतिशय प्रभाविपणे मांडले आहेत. इतर देशांमधून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांना भारताने समावून घेतले आहे. आता साहित्यिकांनी हे विचार लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये गोळ्या घालून ठार मारण्यात आलेल्या नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे या समाजसुधारकांचा उल्लेख करीत अध्यक्षिय भाषणात बोलताना श्रीपाल सबनिस म्हणाले, की इतर धर्मांमधून आलेले विचार आपण स्वीकारला हवेत. संतांच्या जातीनिहाय वाटणीने महाराष्ट्राचे वाटोळे झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये देश सहिष्णू नसल्याचे समोर आले आहे. ही परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल. मराठ्यांचे राज्य सर्व जातीधर्मांचे राज्य होते. हे आपण समजून घ्यायला हवे. साहित्य संमेलनाचे व्यासपीठही सेक्युलर आहे. तसाच देश असायला हवा.
यावेळी संबोधित करताना ज्येष्ठ साहित्यिक आणि गीतकार गुलजार म्हणाले, की पहिल्यांदाच एखाद्या प्रादेशिक भाषेसाठी एवढा मोठा जनसमुदाय उपस्थित आहे. साहित्यरसिकांचे मी मनापासून कौतुक करतो. आपण विदेशी साहित्य सहज वाचतो. पण आपल्या देशातील पुस्तके वाचायची राहुन जातात. आपल्या देशात वेगवेगळ्या भाषांमध्ये भरीव लिखाण करण्यात आले आहे. मराठी त्यापैकी एक भाषा आहे. इतर भाषांमधील साहित्य मराठीत भाषांतरीत व्हावे.
89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन झाले आहे. माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील, ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार गुलजार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.
प्रत्येक मराठी साहित्य संमेलनात स्मरणीकेचे प्रकाशन केले जाते. पण यंदाच्या संमेलनात 'मराठी भाषा संचित आणि नवदिशा' स्मरणग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शरद पवार यांच्यावरील 'लोकनायक शरद पवार' या पुस्तकाचे फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना 88 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी संमेलनाध्यक्षाची सूत्रे प्रदान केली. स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी पाटील यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, काही मान्यवर संमेलनस्थळी उशीरा आल्याने उद्घाटन सोहळ्यास विलंब झाला.
ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित सत्यव्रत शास्त्री, रेहमान राही, केदारनाथसिंह आणि सीताकांत महापात्रा यांच्यासह लेखक प्रा. के. रं. शिरवाडकर आणि प्रकाशक येशू पाटील यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सूत्रसंचालकांच्या भूमिकेत होते.
पुढील स्लाईडवर वाचा, आजचे कार्यक्रम.... अशी आहे संमेलनस्थळी व्यवस्था... कालचा ग्रंथदिंडीचा कार्यक्रम.... आणि बरेच काही....