आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

89 व्या मराठी संमेलनात लक्षावधी ग्रंथसंपदा रसिकांसमोर येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी येथे १५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शनात लक्षावधी ग्रंथसंपदा वाचकांसमोर येणार आहे. राज्यभरातून दीडशे प्रकाशक आणि १७० ग्रंथविक्रेते ग्रंथप्रदर्शनता सहभागी होणार आहेत.

ई-बुकची दालनेही ग्रंथप्रदर्शनात असतील.ग्रंथप्रदर्शनातील दालनांचे वाटप शनिवारी येथे सोडत पद्धतीने काढण्यात आले. एकूण सहा एकर परिसरात ग्रंथप्रदर्शन उभारण्यात येत आहे. १५ जानेवारीला ग्रंथप्रदर्शनाचे उद््घाटन संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. बुकगंगा डॉट कॉम आणि डेलियंट मोबाइल ई बुक हे ई बुक गाळेही प्रदर्शनात समाविष्ट आहेत. याशिवाय १६ दालने साहित्य महामंडळाच्या घटकसंस्था आणि शासकीय प्रकाशनांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.

रोज १० हजार लाइक्स
पिंपरीचे साहित्य संमेलन अधिकाधिक रसिकांच्या तसेच तरुणाईच्या उपस्थितीने रंगावे, असा आयोजकांचा प्रयत्न आहे. संमेलनाच्या फेसबुकवरील पेजला रोज दहा हजारांहून अधिक लाइक्स मिळत आहेत. त्यामुळे आयोजकांचा उत्साह वाढला आहे. मोबाइल अॅप, रेडिओ जिंगल, फेसबुक, ट्विटर, मोबाइल ई-बुक, अद्ययावत संकेतस्थळ, संमेलनाचा लोगो, हे सारे तरुणाईला आवडत असल्याचे दिसत आहे.
ग्रंथदिंडी निघणार झोकात; तयारीने घेतला वेग
नियोजित संमेलनाध्यक्षांची वादग्रस्त वक्तव्ये, त्यावरून उडत असलेला वादविवादांचा धुरळा याच्या पार्श्वभूमीवर पिंपरीमध्ये होत असलेल्या ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीने आता वेग घेतला आहे. मुख्य मंडप, अन्य मंडप, पाहुण्यांची सरबराई, अन्य सुविधा, ग्रंथप्रदर्शनाचे संकुल या साऱ्या तयारीवर आता शेवटचा हात फिरवण्यात येत आहे.

मराठी साहित्य परंपरेतील संत, पंत आणि तंतकवी या संकल्पनेवर आधारित तीन चित्ररथ १५ जानेवारीला निघणाऱ्या ग्रंथदिंडीच्या अग्रभागी असतील. संत ज्ञानेश्वर, तुकोबा, नामदेव, गोराकुंभार, मुक्ताबाई, बहिणाबाई अशा संतकवींची वेशभूषा केलेले विद्यार्थीच या चित्ररथांचे सारथ्य करणार आहेत. अभंग, ओव्या, पोवाडे आणि श्लोकगायनाच्या सुरावटीत हे चित्ररथ मार्गस्थ होतील. ग्रंथदिंडीचा प्रारंभ सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. १५ जानेवारीला वाजता ग्रंथदिंडी निघेल. त्यापूर्वी डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले जाईल.

ही आहेत वैशिष्ट्ये : संत,तंत व पंतकवींच्या दिंड्या, महिला संतांची दिंडी, माहिती-तंत्रज्ञान दिंडी, कामगार दिंडी, पर्यावरण दिंडी.

पालखीत संतसाहित्य : पालखीत संतसाहित्य, महानुभावांचे लीळाचरित्र, फुलेसाहित्य, राज्यघटना, मंगेश पाडगावकर यांचे साहित्य, चिंचवडच्या मोरया गोसावींचे चरित्र असे ग्रंथ असतील.

विविध पथकांचा सहभाग : पखवाजवादक, टाळकरी, वीणेकरी, ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशा पथक, लेझीम व झांजपथक, सनई-चौघडा व तुतारीवादन, अब्दागिरी तसेच वारकरी झेंडे यांचा मोठा सहभाग असेल.
बातम्या आणखी आहेत...