आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: खंडणीसाठी अपहरण केलेल्या 9 वर्षाच्या मुलाची 75 तासानंतर सुखरूप सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आईमसेवत ओम.... - Divya Marathi
आईमसेवत ओम....
पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, पूर्णानगर येथून खंडणीसाठी अपहरण झालेल्या 9 वर्षाच्या मुलाची पुणे पोलिसांच्या दक्षतेमुळे सुखरूप सुटका झाली. अपहरण केलेल्या व्यक्तींच्या ताब्यात हा मुलगा 75 तासांहून अधिक वेळ होता. पोलिसांनी अथक मोहिम राबवल्याने मुलाची सुटका होताच कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
 
ओम संदीप खरात (वय 9) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव असून, ते चिंचवडमधील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकतो. मुलाचे वडिल लघुउद्योजक आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ओमला शनिवारी दुपारी अपार्टमेंटमध्ये बाहेर खेळत होता. त्याचदरम्यान पांढ-या रंगाच्या व काळ्या काचा असलेल्या मोटारीतून आलेल्या अज्ञातांनी ओमला इंडिका गाडीत बसवून अपहरण केले. त्यानंतर लागलीच ओमचे वडिल संदीप यांनी निगडी पोलिसांत धाव घेतली. यानंतर पोलिसांनी ओमच्या सुटकेसाठी शोधमोहिम हाती घेतली. या मोहिमेत वरिष्ठ पोलिस अधिका-यांसह सुमारे 400 पोलिस शोधमोहिमेत सहभागी झाले होते. दुसरीकडे, सोशल मिडियात ओमचे अपहरण झाल्याचे संदेश फिरू लागले. मात्र, पोलिसांनी माध्यमांना बातमी करू नका असे सांगितले. तसे झाल्यास अपहरणकर्ते ओमच्या जीवाचे बरे-वाईट करतील अशी भीती होती.
 
दरम्यान, अपहरणकर्ते ओमच्या आजोबाच्या म्हणजेच संदीपच्या वडिलांच्या मोबाईल क्रमांकावर खंडणीसाठी संपर्क साधत होते. आधी 1 कोटी रूपये, मग 60 लाख रूपये आणि तर शेवटी 20 लाख रूपये खंडणी मागत होते. शिवाय ते शिर्डी, बीड व चिंचवड परिसर आदी वेगवेगळ्या ठिकाणाहून फोन करत होते. मात्र, पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशन टॅप केले होते. शिवाय आरोपी पिंपरी-चिंचवडमध्येच असल्याचे पोलिसांच्या लक्षात येत होते. त्यामुळे पोलिस निगडीच्या केरळ भवन येथून शोध कार्याची सूत्रे हालवत होते. शहरात पोलिसांनी तळ ठोकल्याचे अपहरणकर्त्यांना समजले होते. तसेच पोलिस आपल्या मागावर आहेत हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे अखेर तीन दिवसानंतर म्हणजेच सोमवारी सायंकाळी सहा-साडेसहाच्या दरम्यान त्याला पूर्णानगर परिसरात सोडून दिले. यानंतर ओम घरी पोहचताच पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
 
आपल्याला कारच्या डिकीमध्ये ठेवले होते, असे ओमने सांगितले. तसेच या दरम्यान चॉकलेट, कॅडबरी व वेळेवर जेवण दिले जात होते, असेही ओमने सांगितले. ओमची सुटका झाल्याच्या आनंदात तेथील एका बेकरी मालकाने ओमसाठी खास केक आणला होता. पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ओमला केक भरवला व उपस्थितांनी आनंदाच्या भरात टाळ्या वाजवल्या. यानंतर ओमचे वडिल संदीप खरात यांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिसांमुळेच माझा एकुलता एक मुलगा ओम परत मिळू शकला त्याचा पुर्नजन्मच झाला आहे असे खरात यांनी सांगितले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू होते.
 
आरोपी ओळखीचेच पण नातेवाईक की....
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमचे अपहरण संदीप खरात यांच्यात ओळखीच्या लोकांनी केले होते. संदीप खरात यांचा काही महिन्यांपूर्वी हात मोडला होता त्यावेळी ते काका पप्पांना भेटायला आले होते अशी माहिती ओमने दिल्याचे कळते आहे. त्यामुळे ओमचे अपहरण ओळखीच्या लोकांनी किंवा नातेवाईकांनीच केल्याचा संशय पोलिसांना आहे. ओमचे वडिल लघुउद्योजक आहेत. त्यामुळे त्यांच्या कंपनीशी संबंधित किंवा नातेवाईकांनी पैशांसाठीच हे अपहरण केले असण्याची शक्यता आहे. मात्र, पोलिसांनी यावर अधिक बोलणे टाळले आहे. आरोपी ताब्यात आल्यानंतरच यावर अधिक भाष्य करू असे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या घटनेतील फोटोज, व्हिडिओज व माहिती...
बातम्या आणखी आहेत...