आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 90 Lack Tone Sugar Ramaining In Country, Sugar Rate Not Increasing

देशात 90 लाख टन साखर शिल्लक, साखरेच्या दरात होणार नाही वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘देशात 90 लाख टन व जागतिक स्तरावर चारशे लाख टन साखर शिल्लक आहे. त्यामुळे साखर हंगाम संपेपर्यंत साखरेच्या दरात तेजी येण्याची शक्यता दिसत नाही. मात्र, हंगामा अखेरीस साखर दराची स्थिती सुधारेल,’ असा आशावाद राज्याचे साखर आयुक्त विजय सिंघल यांनी व्यक्त केला आहे.गेल्या वर्षी देशात 250 लाख टन साखर तयार झाली. यातील 90 लाख टन साखर शिल्लक राहिली. महाराष्‍ट्रातील शिल्लक साखरेचा साठा 24 लाख टन आहे. यंदाच्या साखर हंगामात राज्यात 79 लाख टन नवे साखर उत्पादन अपेक्षित आहे. ही साखरेची एकूण उपलब्धता लक्षात घेता 2013-14 चा हंगाम संपेपर्यंत साखरेचे दर स्थिरच राहतील, असे सिंघल म्हणाले.
‘जगातील सर्वात मोठा ऊस उत्पादक देश असलेल्या ब्राझीलला मी नुकताच जाऊन आलो. त्या ठिकाणी आंतरराष्‍ट्रीय साखर उपलब्धतेची माहिती घेतली. ब्राझीलमध्ये यंदा उसाचे चांगले पीक आहे. जगात 400 लाख टन अतिरिक्त साखर राहणार असल्याने त्यांनी 20 ते 25 टक्के ऊस उत्पादन इथेनॉल निर्मितीकडे वळवण्याचे ठरवले आहे. यामुळे येत्या वर्षअखेरपर्यंत ‘ग्लोबल सरप्लस’ उरणार नाही,’ असे स्पष्टीकरणही सिंघल यांनी दिले.
* 250 लाख टन गतवर्षीचे साखर उत्पादन
* 24 लाख टन साखर राज्यात शिल्लक
* 400 लाख टन साखर संपूर्ण देशभरात शिल्लक
* 79 लाख टन साखरेचे यंदा उत्पादन अपेक्षित
ग्राहक-शेतक-यांची लूट ?
गाळप हंगामाच्या सुरुवातीला देशांतर्गत खुल्या बाजारात साखरेची किंमत 3300 ते 3400 रुपये प्रतिक्विंटल होती. ती कमी होऊन आता 2600 ते 2650 रुपये प्रतिक्विंटल झाली असल्याचे सिंघल यांनी सांगितले. साखर कारखाना स्तरावरील किमती उतरल्या असल्या तरी ग्राहकाला बाजारात स्वस्त साखर मिळत नाही. शहरांमध्ये किरकोळ विक्रीचा दर सर्रास 40 रुपये किलो तर मॉल्समधून 50 रुपये किलोपेक्षा जास्त आहे.
दरातील मंदीचे कारण देत कारखानेही ऊसदराबद्दल बोलायला तयार नाहीत, असे विचारल्यावर साखर आयुक्तांनी थेट उत्तर देणे टाळले.
किमान ऊसदर 1650 रु.
साखरदर पडल्याने जादा ऊसदर देण्यात अडचणी आहेत, अशी भूमिका साखर संघाने घेतली आहे. तर उसाला तीन हजार रुपये दर देण्याच्या मागणीवरून शेतकरी संघटना आक्रमक आहेत. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांनी कारखान्यांना अनुकूल भूमिका घेतली आहे. यंदा साडेनऊ टक्के उता-याला 1650 रुपये, साडेदहा टक्के उता-याला 1871, साडेअकरा टक्के उता-याला 2091 तर साडेबारा टक्के उता-यासाठी 2313 रुपये ‘एफआरपी’ जाहीर झाला आहे.
पंतप्रधान भेटलेच नाहीत
साखरेबाबतच्या मागण्या घेऊन कारखानदार पंतप्रधानांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. मात्र, पंतप्रधान त्यांना भेटलेच नाहीत. ‘25 लाख टन साखर निर्यातीसाठी अनुदान द्या, 50 लाख टन साखरेचा संरक्षित साठा करा, कच्च्या साखरेवरचे आयात शुल्क वाढवून 40 टक्के करा,’ या त्यांच्या मागण्या आहेत. परंतु जगात 400 लाख टन अतिरिक्त साठा असताना भारतातील कारखाने किती निर्यात करू शकतील, याबाबतही स्पष्टता नाही.
कारखान्यांकडून फसवणूक
‘गेल्या दिवाळीपासून ते जून-जुलैपर्यंत साखर दर 3200 रुपयांपुढे होता. याचा फायदा घेत खासगी कारखाने साखर विकून मोकळे झाले. त्या वेळी सहकारी कारखान्यांनी चढ्या भावात साखर विकली नाही? महत्त्वाचे म्हणजे जून-जुलैपर्यंत तेजीत असणारी साखर हंगाम सुरूहोताच कशी पडते? व्यापारी व कारखानदारांत संगनमत झाल्यानेच दर घटले. याची चौकशी व्हावी.
सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी संघटना