आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 990 Crore's Help For Cleaning Of Mula And Mutha River

मुळा-मुठा नद्यांना ९९० काेटींचे साह्य, गाेदावरी, चंद्रभागेवर ‘कृपादृष्टी’ केव्हा ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/ नवी दिल्ली - पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा व मुठा या दोन नद्यांच्या शुद्धीकरणाला केंद्र सरकारच्या अर्थ समितीने मंजुरी दिली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रयत्नांमुळे तब्बल ९९० कोटी २६ लाख रुपयांचा राजाश्रय या नद्यांना लाभणार आहे.

जावडेकर पुण्याचे असल्याने त्यांनी केंद्रात स्वतःचे वजन खर्ची टाकून मुळा-मुठेच्या शुद्धीकरणासाठी जोरदार प्रयत्न केले. पुण्याच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने मुळा-मुठेच्या शुद्धीकरणाचे आश्वासन दिले होते. त्यानुसार केंद्रातून निधी आणण्याचे काम जावडेकरांनी मार्गी लावले आहे. मात्र, केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची कृपादृष्टी मुळा-मुठेप्रमाणेच इतर नद्यांवर केव्हा पडणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वर्षातून चार वाऱ्या झेलणारी पंढरपूरची चंद्रभागा, बारा वर्षांतून कुंभमेळा सामावून घेणारी नाशिकची गोदावरी, साखर कारखान्यांनी ‘मैली’ केलेली कोल्हापूरची पंचगंगा, सांगलीची कृष्णा या नद्यादेखील मुळा-मुठेइतक्याच किंबहुना त्यापेक्षा अधिक प्रदूषित आहेत.

सहा वर्षांची डेडलाइन
सन २०२१ पूर्वी हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे बंधन केंद्र सरकार आणि पुणे महापालिकेवर आहे. केंद्राच्या एक्सपेंडिचर फायनान्स कमिटीने मुळा-मुठेच्या शुद्धीकरणास मान्यता दिली असून अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे पाठवला जाणार आहे.

सांडपाण्यावर प्रक्रियेचे ११ प्रकल्प उभारणार
- ३९६ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे नवे ११ प्रकल्प उभारणार. यामुळे पुण्याची रोजची सांडपाणी प्रक्रिया क्षमता ८७३ दशलक्ष लिटर होईल. सन २०२७ पर्यंत ती पुरेशी असेल. - ‘एसटीपी’मधून निर्माण होणाऱ्या वायूपासून वीजनिर्मिती करणार.
- ११३.६ किलोमीटर लांबीच्या सांडपाणी वाहतूक वाहिन्यांचे जाळे उभारणार.
- २४ सार्वजनिक शौचालये बांधणार.
- नदी परिसरात मत्स्यबीज केंद्र, वनस्पती उद्यान निर्माण केले जाणार.

पुण्याची गटार
मुळा व मुठा या नद्या पुण्यातील संगमवाडीत एकत्र येतात. पुढे त्या भीमा नदीला मिळतात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या अतिप्रदूषित ३०२ नद्यांमध्ये मुळा-मुठेचा समावेश आहे. पुण्यातील सांडपाणी या नद्यांमध्ये सोडण्यात आले आहे. पुण्यात दररोज ७२८ दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. यापैकी फक्त ३९२ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया हाेते. येत्या २५ वर्षांत पुण्याची लोकसंख्या ऐंशी लाखांवर जाईल. या पार्श्वभूमीवर मुळा-मुठेची स्वच्छता ही काळाची गरज बनली आहे.

जपानी बँकेचे साहाय्य
मुळा-मुठा नद्यांचा समावेश राष्ट्रीय नदी सुधार प्रकल्पात करण्यात आला आहे. गुरुवारी दिल्लीत या प्रस्तावाला मान्यता मिळाली. मुळा-मुठा विकासासाठी ९९० कोटी ६० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यापैकी ८४१.७२ कोटी रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीतून येणार असून उर्वरित १४८.५४ कोटी पुणे महापालिकेला द्यावे लागतील. या प्रकल्पासाठी जपानच्या इंटरनॅशनल काॅर्पाेरेशन एजन्सीकडून फक्त ०.३० टक्के दराने ४० वर्षे मुदतीचा कर्जपुरवठा केला जाणार आहे.