आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समतेसाठी महात्मा फुलेंच्या विचाराचा उपयाेग व्हावा, प्रा. हरी नरकेंचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘महात्मा जोतीराव फुले यांचे दाखले देत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सव्वाशे वर्षांनंतरही व्हावा हे दुर्दैवी आहे. फुले यांच्या लेखनातील सोयीस्कर संदर्भाचा वापर विद्वेषासाठी करण्याचा प्रयत्न काही संघटना करत असतात. या पार्श्वभूमीवर जोतीराव फुले यांच्या समग्र वाङ््मयाची कधी नव्हे इतकी गरज आज आहे. जोतीरावांचे विचार समता प्रस्थापित करण्यासाठी मोलाचे आहेत, तेढ वाढवण्यासाठी नव्हे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. हरी नरके यांनी केले.


काही वर्षांपासून अनुपलब्ध असलेले ‘महात्मा फुले समग्र वाङ््मय’  बुधवारी (११ एप्रिल) फुले जयंतीचे औचित्य साधून प्रकाशित हाेत आहे. एकूण हजार पानांच्या या ग्रंथातून सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे, परंतु दुर्मिळ दोनशे पृष्ठांचे साहित्य प्रथमच वाचकांसमोर येत आहे. प्रा. हरी नरके यांनी या आवृत्तीचे संपादन केले आहे. या निमित्ताने ‘दिव्य मराठी’ने प्रा. नरके यांच्याशी संवाद साधला.

 

प्रश्न : जोतीराव फुले यांचे साहित्य आजच्या वातावरणाशी ते कसे सुसंगत आहे?
प्रा. नरके : स्त्री-पुरुष समानता, ज्ञानार्जन, कौशल्य निर्मिती, संसाधनांचे फेरवाटप, आंतरजातीय विवाह ही जोतीरावांच्या लेखनातली सूत्रे सार्वकालिक सुसंगत आहेत. शिक्षणाचे महत्त्व सांगणारे, शेअर बाजार, व्यापार, व्यवसायाचे महत्त्व जाणणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व्यक्त होणारे फुले समजून घ्यायला हवेत. या विचारांचा पुरस्कार करणे आवश्यक आहे. एका अर्थी समाजकारण आणि राजकारणाचा अजेंडा काय असावा, हेच त्यांच्या लेखनातून स्पष्ट होते. फुलेंची भाषा त्या वेळच्या काळाला धरून रोखठोक होती. दुर्दैवाने याचाच तेवढा गैरफायदा घेण्याचे ‘उद्योग’ काही संघटनांनी चालवले आहेत. उदाहरणार्थ ‘ब्राह्मणांची सावली पडू देऊ नका,’ असे फुल्यांनी मृत्युपत्रात लिहिल्याचा अपप्रचार केला जातो. वास्तविक फुले यांचे मृत्युपत्र मीच शोधून काढले. तत्कालीन बहुजनांमध्ये मृत्युपत्र तयार करणे हेच अतिदुर्मिळ. तरी फुलेंनी ते का केले? तर त्यांनी ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला होता. त्याचे नाव यशवंत. आपल्या पश्चात आपली सगळी संपत्ती त्याला मिळावी यासाठी त्यांनी मृत्युपत्र लिहिले. त्यावर साक्षीदार म्हणूनसुद्धा सही कोणाची तर रा. ग. भांडारकर यांची. फुले ब्राह्मणद्वेष्टे असते तर हे घडले नसते. त्यांनी लिहिलेले मूळ वाक्य असे ‘जे ब्राह्मण क्षुद्रातिक्षुद्रास दासानुदास मानतात त्यांची सावली पडू देऊ नये.’ यातला सोयीस्कर भाग जातिद्वेषासाठी वापरला जातो. म्हणूनच फुले यांच्या मृत्युपत्राची फोटोकॉपी  या ग्रंथात आहे.
भिडे, वाळवेकर, परांजपे, जोशी फुलेंचे सहकारी होते. लहुजी वस्ताद साळवे, रानबा महार, धुराजी चांभार, गणू मांग हे दलित लोकही त्यांच्यासोबत होते. उस्मान शेख, फातिमा शेख यांनीही साथ दिली. जोतीरावांनी १८८९ मध्ये छत्रपतींचा पोवाडा लिहिला. भांडारकरांनी त्यासाठी प्रोत्साहन दिले, अशी कृतज्ञता फुले व्यक्त करतात. ‘ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी!’ असे लिहिणाऱ्या जोतीरावांचा विरोध प्रवृत्तीला आहे; विशिष्ट जातीला नाही, हे समजून घेतले पाहिजे.


प्रश्न : नव्या फुले साहित्यात दुर्मिळ काय ?
प्रा. नरके : फुलेंनी नियतकालिकांमधून विपुल लेखन केले. त्यांच्या पत्रकारितेतील सामाजिक आशय विलक्षण आहे.  ‘दीनबंधू’ वृत्तपत्रात त्यांनी लिहिलेले वृत्तांत सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. तळेगाव ढमढेरे गावातल्या कऱ्हेकर (नाभिक) व भुजबळ (माळी) आडनावांच्या दोन स्त्रियांनी १८८७ मध्ये सत्यशोधक पद्धतीने लग्न लावण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध झाला. मग या दाेघींनी फुलेंना पत्र पाठवले. त्यांनी गावात जाऊन विरोध करणाऱ्यांचे प्रबोधन केले. फार यश आले नाही. शेवटी पोलिस बंदोबस्तात लग्न लावावे लागले. तत्पूर्वी पुण्यातही जोतीरावांनी बंदोबस्तात सत्यशोधक पद्धतीने लग्न लावले हाेते. या सामाजिक संघर्षाचे वर्णन त्यांनी ‘दीनबंधू’मधून केले अाहेे.
बालविवाह, विधवा विवाह यासंदर्भात तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नरने देशातल्या मोजक्या विचारवंतांकडून त्यांचा अभिप्राय मागितला होता. यात जोतीराव होते. त्यांनी एका प्रसंगाचे हृदयद्रावक वर्णन पत्रातून केले आहे. सदाशिव गोवंडे हे पुण्यातले ब्राह्मण गृहस्थ जोतीरावांचे बालमित्र होते. रेव्हेन्यू खात्यात असिस्टंट कमिशनर होते. त्यांच्या घरी काशीबाई नावाची तरुण ब्राह्मण विधवा स्वयंपाकाचे काम करत असे. विधवा असूनही ती गरोदर राहिली. तिने गर्भपाताचे खूप प्रयत्न केले, पण ते अयशस्वी झाले. अखेरीस गोंडस बाळाला तिने जन्म दिला. परंतु, समाजाच्या भीतीने तिने   बाळाला विळीवर चिरले आणि विहिरीत टाकून दिले. हा गुन्हा कोर्टाच्या पायरीवर गेला. काशीबाईला १८६३ मध्ये काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली. काळ्या पाण्याची शिक्षा होणारी त्या काळातली ती पहिली स्त्री ठरली. या घटनेने अस्वस्थ झालेले जोतीराव लिहितात, ‘त्या रात्री मी व सावित्री जेवू शकलो नाही. त्या तरुण विधवेने बाळाची हत्या केली नाही. समाजाने तिला भाग पाडले. म्हणून मिळकत आमच्या पोटापुरती नसतानाही आम्ही विधवांच्या मुलांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. या गृहात ३५ ब्राह्मण विधवांची बाळंतपणे सावित्रीने केली.’

 

 संग्राह्य ‘महात्मा फुले समग्र वाङ््मय’
लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे १९६९ मध्ये पहिल्यांदा ‘महात्मा फुले समग्र साहित्या’चे प्रकाशन केले. त्यानंतर १९९१ मध्ये डॉ. य. दि. फडके यांनी नव्या संशोधनासह संपादित आवृत्ती काढली. या आवृत्तीसाठी मी संपादन साहाय्य केले होते. जोतीरावांचे दत्तकपुत्र यशवंतराव यांनी स्वतः लिहिलेले फुले चरित्र, जोतीरावांच्या सहकाऱ्यांनी लिहिलेली चरित्रे, जोतीरावांचे समग्र लेखन, त्यांच्या पुस्तकांमधल्या प्रस्तावना आदी दुर्मिळ मजकुराची भर घालून ‘समग्र फुले वाङ््मय’ प्रकाशित होत आहे. हा ग्रंथ शासनाच्या सर्व ग्रंथागारांमध्ये मुंबई, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, पुण्यात उपलब्ध होईल, असे प्रा. नरके यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...