आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे बापरे! काँग्रेस पक्ष बारामती लोकसभा लढणार म्हणजे आमचं डिपॉजिटच जप्त की राव..- अजित पवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यातील हडपसर येथील जाहीर सभेत बोलताना अजित पवार.... - Divya Marathi
पुण्यातील हडपसर येथील जाहीर सभेत बोलताना अजित पवार....

पुणे- पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील हल्लाबोल आंदोलन सभेत केली होती. अजित पवारांच्या घोषणेनंतर काँग्रेसनेही आमची ताकद बारामती लोकसभा मतदारसंघात वाढल्याने आमचा उमेदवार ही जागा लढवेल असे पुडी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवीदास भन्साळी यांनी सोडली. भन्साळीच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांनी गुरूवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत याची चांगलीच खिल्ली उडविली. 

अजित पवार म्हणाले, अरे बापरे! काँग्रेसचा उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघातून आता लढणार म्हणजे आमचं डिपॉजिटचं जप्त होणार की राव.... अशी खोचक टिप्पणी केली.

 

पुणे शहरातील लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीने ही जागा कधीही लढविली नाही. 2009 मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी पुण्याचे खासदार होते. मात्र, 2014 साली मोदी लाटेत भाजपने ही जागा खेचली. मात्र, आता पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात काँग्रेसची संघटना पातळीवर अवस्था खूपच वाईट आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद मोठी आहे. पुणे महापालिकेत सुद्धा भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीचे नगरसेवक व ताकद आहे. त्यामुळे पुण्यातील जागा राष्ट्रवादी लढण्यास उत्सुक आहे. 

 

काँग्रेसकडेही पुणे लोकसभेसाठी तगडा उमेदवार नाही. 2014 साली प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांचा 3 लाखांहून मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे कदम आगामी लोकसभा निवडणूक पुण्याऐवजी सांगलीमधून लढविण्यास उत्सुक आहेत. विश्वजित कदम हे एक तर सांगली लोकसभेतून लढतील किंवा पलूस-कडेगाव येथून आपल्या दिवंगत पित्याच्या जागी विधानसभेची निवडणूक लढवतील हे नक्की आहे. त्यामुळे पुण्यात काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध सुरू असतानाच अजित पवारांनी पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. 

 

पुण्याची लोकसभा आपल्या ताब्यात घेऊन भंडारा-गोंदिया ही राष्ट्रवादीची जागा काँग्रेसच्या नाना पटोलेंना सोडण्याचा विचार पक्ष करत आहे. येत्या काही दिवसातच तेथे पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांची मुदत जून 2020 पर्यंत आहे. शिवाय नाना पटोलेंसमोर पटेल यांचा निभाव लागेल की नाही याचा कोणताही भरवसा पक्षाला नाही त्यामुळे ही अदलाबदल करावी असे अजित पवारांना वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

 

पुणे लोकसभा भाजपच जिंकणार- संजय काकडे

 

2019 मध्ये पुणे लोकसभा भाजपच जिंकेल. ही जागा काँग्रेस लढो की राष्ट्रवादी भाजपचा विजय 3 लाखांहून अधिक मतांनी होणार हे स्पष्ट आहे, असे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी या वादावर भाष्य करताना प्रतिक्रिया दिली आहे.    

बातम्या आणखी आहेत...