PUNE: आताचे राजकर्ते / PUNE: आताचे राजकर्ते दुपारच्या झोपा काढतात- अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला

दिव्यमराठी वेब टीम

May 30,2018 05:59:00 PM IST

पुणे- भाजपच्या मंत्र्यांचे प्रशासनातील अधिकारी काहीही ऐकत नाहीत. कारण त्यांच्यात ती धमकच नाही. काम कसे करून घ्यायचे हे त्यांना जमत नाही. हे मंत्री दुपारचे झोपा काढणारे आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना टोला हाणला.

सरकारविरोधात पक्षाने काढलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा समारोप 10 जूनला पुण्यात होणार आहे. त्यासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा कसबा पर्वती मतदारसंघात झाला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. निवडणुका, भाजपची प्रचार यंत्रणा, ईव्हीएममधील गोंधळ, मंत्र्यांचे गैरव्यवहार, महागाई, इंधन दरवाढ यावरूनही अजित पवार यांनी केंद्र, राज्य सरकारला लक्ष केले.

राज्य सरकारमधील मंत्री मला सांगतात, दादा अधिकारी आमचे ऐकतच नाहीत. ते तुमचे ऐकायचे, तेव्हा तुम्ही काय करायचा? असे सांगून आत्ताचे राज्यकर्ते रोज दुपारी झोपा काढतात. मी सकाळी साडेसात-आठ वाजता बैठका घ्यायचो, तेव्हा अधिकारीही यायचे. त्यासाठी धमक लागते, अशा शब्दांत अजित पवार यांनी मंगळवारी राज्यातील मंत्र्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप तोडपाणी करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

गिरीश बापट यांच्या कसबा मतदारसंघाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, कसबा मतदारसंघाची एक वेगळी ओळख असून ती पुसून टाकण्याची गरज आहे. याच मतदार संघातून वसंतराव थोरात हे देखील निवडून गेले होते. त्यामुळे कसब्यातही बदल घडू शकतो हे लक्षात ठेवा. गिरीश बापट, या वयात काय बोलावे हे कळत नसलेली व्यक्ती येथील लोकांनी निवडून दिली आहे, असे सांगून पवार यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर टीका केली.

X