आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे - यंदाचे वर्ष भारतासाठी गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक कापूस उत्पादनाचे ठरत असतानाच शेजारी बांगलादेश भारतीय कापसाचा सर्वात मोठा आयातदार ठरला आहे. आतापर्यंत बांगलादेशाने २१ लाख गाठी (एका गाठीचे वजन १७० किलो) भारतीय कापूस आयात केला. युरोप-अमेरिकी देशांमध्ये तयार कपडे निर्यात करणारा बांगलादेश त्याची ९० टक्के कापसाची गरज भारताकडून भागवतो.
गुलाबी बोंडअळीचे संकट आल्याने यंदाच्या अपेक्षित कापूस उत्पादनात अंशतः घट झाली. तरीही गेल्या ३ वर्षांच्या तुलनेत भारताचे कापूस उत्पादन जागतिक स्तरावर सर्वोच्च राहिले आहे. सन २०१७-१८ च्या हंगामात भारतीय कापसाचे उत्पादन ३६० लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीचे उत्पादन ३३७ लाख गाठी होते. यंदा आतापर्यंत ५३ लाख गाठी कापूस निर्यात झाला.
चीन, पाकिस्तान व बांगलादेश हे भारतीय कापसाचे मोठे आयातदार आहेत. मात्र, यंदा बांगलादेशाने आयातीच्या बाबतीत चीनलाही मागे टाकले. कापूस निर्यातीवर कोणतेही निर्बंध नाहीत. कोलकाता बंदरातून आणि रस्ते वाहतुकीद्वारे भारतीय कापूस बांगलादेशात पोहोचतो. बांगलादेशात ८५ पेक्षा जास्त टेक्स्टाइल कारखाने आहेत. मात्र, या कारखान्यांची गरज भागवणारे कापूस उत्पादन त्या देशात होत नाही. त्यामुळे बांगलादेशी कापड व्यवसायाची ९० टक्के गरज भारतीय कापसाकडून भागवली जाते. भारतीय कापूस संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीचा शिल्लक कापूस साठा आणि आयात लक्षात घेता यंदाची देशातली एकूण कापूस उपलब्धता ४१२ लाख गाठी असणार आहे. ]
भारत दुसऱ्या क्रमांकाचा कापूस निर्यातदार
देशांतर्गत कापसाची गरज ३२४ लाख गाठींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यानुसार यंदाची निर्यात ७० लाख गाठींपर्यंत जाऊ शकेल. गेल्या वर्षी ६३ लाख गाठींची निर्यात केली होती.अमेरिकनंतर भारत दुसऱ्या क्रमांकाचा कापूस निर्यातदार आहे. अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार तणावामुळे चीन भारतीय कापसाची आयात वाढवू शकतो. अमेरिकेच्या तुलनेत भारतीय कापूस स्वस्त असल्याने शेजारी देशाव्यतिरिक्त तुर्कस्तान, इंडोनेशिया, व्हिएतनाममध्येही कापसाला मागणी आहे.
यंदा क्षेत्र घटणार?
बीटी कापसाचे आगमन झाल्यानंतर देशाच्या कापूस उत्पादनात प्रचंड वाढ झाली. दोन दशकांत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा कापूस निर्यातदार देश होण्यापर्यंत भारताने मजल मारली. मात्र, यंदाच्या गुलाबी बोंडअळीच्या संकटामुळे व बीटी कापसावर येणाऱ्या कीड-रोगांचे प्रमाण वाढल्यामुळे कापूस उत्पादक पर्यायांचा विचार करू शकतात. राष्ट्रीय बीज उत्पादक संघटनेच्या मते येत्या हंगामात कापसाखालील क्षेत्रात ४-५% घट होण्याची भीती आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र व कर्नाटकातील कापूस क्षेत्र कमी होऊ शकते. बियाण्याची मात्र कमतरता असणार नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.