आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांच्या ‘वेफर्स-पेढ्यां’नी भाजपच्या उपवासाला गालबोट; पुण्यात अांदाेलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी उपवास आंदोलन केले. - Divya Marathi
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी उपवास आंदोलन केले.

पुणे - काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज चालू न दिल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय उपवास कार्यक्रमाला पुण्यातल्या दोन भाजप आमदारांनी खाल्लेल्या ‘वेफर्स-पेढ्यां’चे गालबोट लागले.    


गुरुवारी सकाळी साडेनऊ ते पाच दरम्यान पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपवास केला. पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह अनेकांनी त्यांना साथ दिली. एकमेकांमध्ये फारसे सख्ख्य नसलेल्या पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनीही उपाेषणात सहभाग नाेंदवला. राज्यमंत्री  दिलीप कांबळे हेही उपस्थित होते. 


भाजप आमदार भीमराव तापकीर आणि संजय भेगडे हे दोघे गुरुवारी आयोजित शासकीय बैठकीत संॅडविच, वेफर्स, पेढे खात असल्याचा व्हिडीओ दुपारनंतर व्हायरल झाला. याची तुलना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दाेन दिवसांपूर्वी दिल्लीतल्या उपवासादरम्यान खाल्लेल्या ‘छोले-भटुऱ्यां’शी केली गेली. पक्षाचा राष्ट्रीय उपवास कार्यक्रम चालू असतानाच त्यांच्या खानपानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजपची कोंडी झाली. आम्ही दोघेही सकाळपासून उपाशी असल्याचा खुलासा दोन्ही आमदारांनी नंतर केला. त्यास उशीर झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपवासाच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी खाऊ-पिऊ नका, अशा सूचना आदल्या दिवशीच दिल्या होत्या. मात्र त्याचा विसर या दोन्ही आमदारांना पडला आणि त्याची किंमत भाजपला चुकवावी लागली.  दरम्यान, पालकमंत्री बापट, खासदार शिरोळे आदींनी वेळेप्रमाणे उपवास पूर्ण केला. 

 

खरीप हंगाम बैठकीत पदार्थांवर मारला ताव  
तापकीर व भेगडे या दोघांनी सकाळी उपवास कार्यक्रम स्थळी उपस्थिती लावली होती. त्यानंतर नियोजित बैठकीसाठी ते पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासमवेत रवाना झाले. खरीप हंगाम आणि जलयुक्त शिवार योजनेची ही बैठक होती. या सरकारी बैठकीला नेहमीप्रमाणे सँडविच, वेफर्स आणि पेढ्यांची बशी समोर आली. त्यावेळी या दोन्ही आमदारांना राहवले नाही. त्यांनी समोर आलेल्या पदार्थांना त्यांच्या पोटात जागा दिली. नेमके हे दृश्य मोबाइल कॅमेऱ्यांमध्ये टिपले गेले आणि नंतर प्रचंड वेगाने व्हायरल झाले.

 

 

जनतेने नाकारल्याने विरोधकांचा थयथयाट : मुख्यमंत्र्यांचा आरोप
संसदेत काहींनी थिल्लरपणा चालवला आहे. जनतेने नाकारल्यामुळे यांचा थयथयाट चालला असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. 
भाजपने मुंबईतही विविध ठिकाणी उपोषण आयोजित केले होते. विलेपार्ले येथे मुख्यमंत्र्यांसह मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, खासदार पूनम महाजन, परेश रावल अादी तर ठाणे कोर्ट नाका येथे रेल्वे मंत्री पीयूष गोयल, किरीट सोमैया आदींनी उपोषण केला. 

 

पुण्यातील उपोषणाला हे नेते उपस्थित-

 

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार भिमराव तापकीर, विजय काळे, आमदार बाळा भेगडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, पुणे महानगरपालिका गटनेते श्रीनाथ भिमाले, सुशील मेंगडे, मुरली मोहोळ, दीपक पोटे, राजेश येनपुरे, गायत्री खडके, यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

काय म्हणाले पालकमंत्री गिरीश बापट-

 

राजकीय स्वार्थापोटी काँग्रेस सह विरोधी पक्षातील खासदार वारंवार संसदेचे कामकाज बंद पाडत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचे कामकाज अत्यंत पारदर्शकपणे व योग्य रित्या सुरु आहे. मात्र हे सहन होत नसल्याने केवळ राजकीय विरोधासाठी संसदेचे कामकाज विरोधक चालू देत नाहीत. नुकतेच झालेल्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही विरोधी पक्षांनी गोंधळ घालून संसदेचे कामकाज चालू दिल नाही. यामुळे देशातील जनतेचं खूप मोठं नुकसान होत आहे. याचा निषेध करण्यासाठी केंद्र व राज्यातील मंत्री, खासदार, आमदार तसेच भाजप पदाधिकारी देशभरात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आहेत. याच उपोषणाचा भाग म्हणून बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरू असलेल्या उपोषणात सहभागी झालो, असे गिरीश बापट म्हणाले.

 

खरीप हंगाम आढावा बैठक-

 

आज विधानभवन येथे खरीप हंगामाबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत या वर्षीच्या हंगामासाठी लागणारे बियाणे व रासायनिक खतांचे नियोजन, पीक कर्ज वाटप नियोजन,सिंचन नियोजन, ग्रामीण भागातील कृषी पंपाना वीजपुरवठा याबाबत चर्चा झाली. प्रतिहेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी उपाय योजना कराव्यात यासाठी कृषि यांत्रिकीकरण वाढवण्यावर भर द्यावा अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. भूजल पाणीसाठा वाढवण्यासाठी जिल्ह्यातील शेततळ्यांची संख्या वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे,त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ द्यावा तसेच सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा अशा सूचना त्यांनी बैठकीदरम्यान दिल्या.

 

बैठकीला बापट यांच्यासह आमदार बाळा भेगडे, राहुल कुल, भिमराव तापकीर, सुरेश गोरे, जिल्हाधिकरी सौरव राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल यांच्यासह अन्य अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...