आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे- रशियन कम्युनिस्ट व्लादिमीर लेनिनचा त्रिपुरात पाडलेला पुतळा पुन्हा उभारण्याचा मुद्दा त्रिपुरा सरकारसाठी अजिबात महत्त्वाचा नसल्याचे सूतोवाच भाजप नेतृत्वाने केले आहे. ‘लेनिनचा पुतळा पाडला गेल्याचे समर्थन आम्ही करत नाही; मात्र या पुतळ्यांपेक्षा त्रिपुरातल्या जिवंत माणसांचे प्रश्न गंभीर असून ते सोडवण्यावर आमचा भर असेल,’ असे भाजपचे त्रिपुरा प्रभारी सुनील देवधर यांनी स्पष्ट केले.
पंचवीस वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवून त्रिपुरात पहिल्यांदाच भाजपचे राज्य स्थापन झाले. या विजयाचे शिल्पकार मानले जाणारे देवधर पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापात बोलत होते.
ते म्हणाले, त्रिपुराचे राजे महाराज बीर विक्रम सिंह यांचा एकमेव पुतळा उभारण्याचे काम सरकार करेल. आगरतळा विमानतळाच्या प्रांगणात हा पुतळा उभारला जाईल. बाकी पुतळ्यांच्या राजकारणात भाजपला रस नाही. त्याऐवजी त्रिपुरातली गुन्हेगारी, गरिबी व भ्रष्टाचार मोडून काढण्यास आमचे प्राधान्य असेल. साध्या राहणीचे मुख्यमंत्री माणिक सरकार ही प्रतिमा खोटी असून त्यांच्या कारकीर्दीत त्रिपुराची सर्व क्षेत्रांत पीछेहाट झाली. डाव्या विचारसरणीच्या सरकार प्रशासनाने त्रिपुराला गरिबी आणि गुन्हेगारीच्या खाईत लोटले, असेही ते म्हणाले.
त्रिपुरासुंदरीचा डंका वाजवू
‘निसर्गसौंदर्याने नटलेल्या त्रिपुराचा विकास ठप्प आहे. साडेसोळा हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या त्रिपुराचे स्वतःचे उत्पन्न अवघे १० टक्के आहे. बाकी पैसे केंद्राकडून येतात. मोदी सरकारने महामार्ग, विमानतळ व रेल्वे विकासाच्या माध्यमातून त्रिपुराला देशाशी जोडण्याचे काम यापूर्वीच सुरू केले. या माध्यमातून येथे व्यापारउदीम वाढेल. पर्यटन विकासाची मोठी संधी त्रिपुरापुढे आहे. पर्यटनातून संपत्ती आणि रोजगार निर्माण करण्यासाठी येथील त्रिपुरासुंदरी देवीचा डंका आम्ही आता वाजवू,’ असे देवधर म्हणाले.
‘माणका’ची चमक खोटी
‘४० किमी अंतरावर जायलासुद्धा माणिक सरकार हेलिकॉप्टर वापरत. चिटफंड घोटाळे व जमीन गैरव्यवहारात सरकार यांच्या निकटवर्तीय व नातेवाइकांचे हात आहेत. ते वीस वर्षे मुख्यमंत्री होते. या काळात त्रिपुरातली ६७ टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली गेली. आणखी २० टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. मात्र, हे लोक कम्युनिस्ट समर्थक नसल्याने त्यांना ‘बीपीएल कार्ड’ दिली गेली नाहीत. सरकार यांच्याच कारकीर्दीत गुन्हेगारी निर्देशांक व महिला अत्याचारात त्रिपुरा देशात आघाडीवर राहिले.’
अमित शहांना दिली होती त्रिपुरात विजयाची ग्वाही
‘चाहे मेरी जान जाए, मैं आपको त्रिपुरा ला के दूंगा,’ असा शब्द मी अमित शहांना दिला होता. त्यावर मरण्याची भाषा कशाला, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. त्यावर मी त्यांना सांगितले, कम्युनिस्टांची कमालीची दहशत असलेल्या त्रिपुरात राजकीय सूड म्हणून शेकडोंच्या संख्येने हत्या आणि बलात्कार झाले आहेत. लोकांमध्ये खूप भीती आहे. त्रिपुरात जाण्यापूर्वी मलाही अनेकांनी जपून बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यावर अमितजींनी मला विश्वास दिला, “तुला मी तिथे पाठवले असल्याचे सगळ्यांना माहिती आहे. तुला कोणी हात लावणार नाही,” असा किस्सा सुनील देवधर यांनी सांगितला. ते म्हणाले, स्वतः कोणतीही सुरक्षा न घेता डाव्यांच्या विरोधात खेडोपाडी प्रचार करत असल्याचे पाहून तिथल्या जनतेमध्येही भाजपबद्दल विश्वास निर्माण झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.