आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेस्ट कॅन्सर जनजागृतीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; 1919 महिलांनी घेतले मार्गदर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दोन हजारपेक्षा जास्त महिलांनी एका छताखाली येऊन ब्रेस्ट कॅन्सरविषयी समजून घेणे आणि सलग सहा मिनिटे ब्रेस्ट कॅन्सरचे प्रतीक असलेल्या  गुलाबी रंगाचे नेलपॉलिश बोटांना  लावण्याचा विश्वविक्रम रविवारी यशस्वी केला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या जनजागृती कार्यक्रमाची नोंद झाली आहे. १९५६ महिलांनी नेलपॉलिश लावून, तर १९१९ महिलांनी  ब्रेस्ट कॅन्सरवरील मार्गदर्शन   या कार्यक्रमाच्या   माध्यमातून घेतले.    


पुण्यातील ओवायई (ओपन युअर आइज) फाउंडेशनतर्फे प्रशांती कॅन्सर केअर मिशन आणि पॉलिकॅब केबल्स  यांच्या  सहयोगाने रविवारी येरवडा येथील डेक्कन महाविद्यालयाच्या  कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा विश्वविक्रम प्रस्थापित झाला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या  निरीक्षण अधिकारी लुसिया  सिनीगॅग्लियसी  यांनी या दोन्हीही विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र ओवायई फाउंडेशनच्या  पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. याप्रसंगी  प्रशांती कॅन्सर सेंटरच्या लालेह  बुशेरी, फाउंडेशनच्या  संस्थापक अध्यक्षा सिमरन जेठवानी, आंतरराष्ट्रीय संचालिका लीला पूनावाला आदी उपस्थित होत्या. 

   
सिमरन जेठवानी म्हणाल्या, ‘स्तनाच्या कर्करोगाबाबत  जनजागृती होतानाच दोन विश्वविक्रम झाले ही बाब आनंददायी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या उपक्रमाची तयारी सुरू होती. शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, संस्था आणि छोट्या छोट्या गटांतून महिला यामध्ये  सहभागी झाल्या. दोन हजारपेक्षा अधिक महिलांनी यात सहभाग घेतला. प्रसिद्ध स्तन कर्करोगतज्ज्ञ डॉ. चैतन्यानंद  कोप्पीकर यांच्यासह  त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी उपयुक्त  मार्गदर्शन केले.’  


भारतीयांनी घडवला विक्रम  
लुसिया  सिनीगॅग्लियसी म्हणाल्या, “जवळपास दोन हजार महिलांनी एकाच वेळी ब्रेस्ट कॅन्सरविषयी जाणून घेत जनजागृती केली. असा उपक्रम जगभरात पहिल्यांदाच झाला आहे. भारतीयांनी  हा विक्रम घडवून आणला. सहभागी महिला अतिशय उत्सुकपणे आणि लक्ष देऊन सगळे समजून घेत होत्या. प्रत्येक गोष्ट मन लावून करत होत्या हे पाहून आनंद वाटला.’ वेळ निरीक्षणाचे काम शिवाजी माने व वैभव खरे यांनी केले.   


घरातील लाेकांनी द्यावा रुग्णांना अाधार  
डॉ. चैतन्यानंद कोप्पीकर म्हणाले, “स्तनाचा कर्करोग हा पूर्णपणे बरा होणारा आहे. वेळीच तपासण्या केल्या आणि योग्य उपचार केले, तर या आजारातून सुटका होऊ शकते. या आजाराचे निदान झाल्यास घाबरून किंवा नैराश्यात न जाता योग्य उपचार घ्यावेत. तसेच तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. इतर मंडळींनी अशा व्यक्तींना आधार दिला, तर त्यातून लवकर बाहेर पडणे सोयीचे होते.   

बातम्या आणखी आहेत...