आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवडमध्ये कंत्राटी सफाई कामगारांचा ठेकेदारांविरोधात महापालिकेवर हल्लाबोल मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी विविध मागण्यासाठी महापालिकेवर मोर्चा काढला. यात मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग होता. ठेकेदार दडपशाही, दमदाटी करतात असा आरोप मोर्चेकरी महिलांनी केला. काही महिलांचा गेल्या दोन महिन्यांपासून पगार झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. किमान वेतन देण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा होता.

 

 

या आधी 26 डिसेंबर रोजी कामगारांनी बेमुदत उपोषण केले होते. त्यावेळी 11 पैकी केवळ एकच मागणी मान्य करण्यात आली होती. सध्या 8 प्रभागातील ठेकेदाराकडून मानसिक त्रास दिला जात असून दाद मागण्यासाठी कोणाकडे जायचे नाही अशा प्रकारची दमदाटी केली जाते.  कामावरून कमी केले जाईल असे सांगण्यात येते. गेल्या दोन महिन्यांपासून एक हजार कामगारांपैकी काहींचे पगार झाले आहेत. उर्वरित कामगारांचे पगार झाले नाहीत. तर 11 हजार 300 रुपये पगार असताना केवळ 5 हजार 500 आणि 7 हजार 500 रुपये एवढाच पगार दिला जात आहे, असे कामगार महिलांनी सांगितले. करारनाम्यातील अटी आणि शर्तीनुसार कामगारांना किमान वेतन दराने पगार देण्यात यावा, साप्ताहिक सुट्टीचा पगार भरून देण्यात यावा, तसेच ओळखपत्र, गणवेश याचा खर्च ठेकेदाराने करावा. पगार धनादेशाने देण्यात यावा या प्रमुख मागण्या असून गेल्या तीन महिन्याचा भविष्य निर्वाह निधी ठेकेदाराने भरलेला नाही तो भरावा अशा प्रमुख मागण्या सफाई कामगारांनी केल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कामगारांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...