आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीय प्रचारामुळे राजू शेट्टी यांना हवी ‘हाता’ची साथ, वाचा दिव्य मराठी विश्लेषण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातून सलग दोनदा खासदारकी जिंकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी इतिहास घडवला. येत्या २०१९ च्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात सुरू झालेल्या जातीय प्रचारामुळे मात्र शेट्टी कधी नव्हे इतके अडचणीत सापडले आहेत. खासदारकीची हॅट्ट्रिक साधण्यासाठी शेट्टींना मतदारसंघातली जातीय गणिते जुळवणे आवश्यक बनले आहे. यातूनच शेट्टींनी काँग्रेससोबतची जवळीक वाढवल्याचे सांगितले जात आहे.


शेट्टी यांचा सध्याचा हातकणंगले मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेस विचारांचा आहे. काँग्रेसच्या बाळासाहेब माने यांनी १९७७ ते १९९१ या काळात येथून पाच वेळा बाजी मारली. त्यानंतर काँग्रेसकडून कल्लाप्पा आवाडे यांनी दोनदा विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर माने घराण्यातल्या निवेदिता माने हातकणंगल्यातून दोनदा खासदार झाल्या. सन २००९ मध्ये राजू शेट्टी यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून येथून दणदणीत विजय मिळवला. पुढे २०१४ च्या निवडणूक जागावाटपात ‘राष्ट्रवादी’ने हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला बहाल केला. त्याही वेळी शेट्टी यांनी विजयी घोडदौड कायम राखली. 

 

मराठा, जैन आणि लिंगायत या तीन समूहांचे हातकणंगल्यात वर्चस्व आहे. जैन समाजाचे सुमारे दीड लाख मतदान या मतदारसंघात आहे. स्वतः जैन असलेल्या शेट्टींनी या मतपेढीसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मते मोठ्या प्रमाणावर मिळवत आपले बस्तान बसवले आहे. प्रामाणिक प्रतिमा असलेल्या शेट्टींना सामान्य शेतकरी वर्गातून मिळणारे पाठबळ कायम आहे. याला खिंडार पाडण्यासाठी अलीकडच्या काळात शेट्टींविरोधात आक्रमक जातीय प्रचार सुरू झाला आहे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेही शेट्टी यांच्या जातीचा सूचक उल्लेख करून त्यांच्याविरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला.

 

मात्र, शेट्टींविरोधातल्या जातीय प्रचाराला मतदारांनी आजपर्यंत तरी साथ दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब माने घराण्यातील धैर्यशील माने यांनी २०१९ ची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असलेल्या माने यांनी बहुजन समाजाची मोट बांधणार असल्याचे सांगत त्यांची दिशा स्पष्ट केली आहे. “राजू शेट्टींचे राजकारण बहुजन समाजाविरोधात असल्याचा अनुभव राज्यमंत्री सदाशिव खोत यांना आला असेल. बहुजन समाजातील असल्याने सदाभाऊंचे खच्चीकरण करण्याचे काम शेट्टींनी केले,’ असे सांगत अप्रत्यक्षपणे मराठा मतदारांची मोट बांधण्याचा प्रयत्न माने यांनी चालवला आहे.

 

शेट्टी यांच्यापासून फारकत घेत स्वतःची संघटना काढल्यापासून राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तर थेटच आरोप करायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यास शेट्टींविरोधात लढण्यास तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. “हातकणंगले मतदारसंघातील मतदारांना आता बहुजन समाजाचा कार्यकर्ता हवा आहे. लोकांनाच बदल पाहिजे. ‘एक मराठा लाख मराठा असे संदेश सोशल मीडियातून फिरवले जात आहेत. ही भविष्याची नांदी आहे’ या शब्दांत खोत यांनी त्यांची भूमिका नुकतीच जाहीर केली हाेती.  


हातकणंगल्यातले गणित
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार शिवसेनेकडे आहेत. एक भाजपकडे आणि दुसरा राष्ट्रवादीकडे आहे. शेट्टींच्या पराभवासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी कंबर कसली आहे. इस्लामपूरचे आमदार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनाही शेट्टी नको आहेत. एकेकाळचे दोस्त असलेल्या याच मतदारसंघातल्या सदा खोतांनीही जोरदार आघाडी उघडली आहे.

 

विरोधकांमधल्या वाढत्या एकीला जातीय प्रचाराची साथ देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने शेट्टींपुढचे आव्हान बिकट बनले आहे. पारंपरिक काँग्रेस  विचारधारेच्या या मतदारसंघात काँग्रेसने साथ दिली तरच शेट्टींचे गणित सोपे होऊ शकते. या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी काँग्रेसशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न चालवल्याचे सांगितले जाते.

 

राजू शेट्टी यांचा धरसोडपणा  
राजकीय भूमिकांमध्ये राजू शेट्टी यांनी नेहमीच धरसोडपणा दाखवला आहे. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी भाजपबरोबर आघाडी केली. त्या वेळी भाजप- शिवसेना जातीयवादी असल्याचे सांगत राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वेगळी चूल मांडली. याच शेट्टींनी २०१४ मध्ये काँग्रेसचा पराभव करण्याचे कारण सांगत भाजपसोबत युती केली. ऊस आंदोलनांच्या माध्यमातून ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या साखर पट्ट्यातल्या राजकारणाला शेट्टी यांनी गेली दोन दशके सातत्याने धक्के दिले. स्वतः शेट्टींसह स्वाभिमानीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ऊस आंदोलनात रक्त सांडले. तुरुंगवास भोगला. काहींनी जीवही गमावला. काँग्रेसच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला, अशी भूमिका शेट्टींनी सातत्याने मांडली. त्याच काँग्रेससोबत जाण्याचे संकेत राहुल गांधी यांच्याबरोबरच्या बैठकीतून शेट्टींनी दिले आहेत. यामुळे स्वाभिमानी कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे. 

बातम्या आणखी आहेत...