आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्ययावत रडार, तज्ञांंच्या अभावामुळे दरवर्षी गारपीटने काेट्यवधींचे नुकसान! जागरूक राहण्याची गरज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अद्ययावत रडार यंत्रणा आणि उपग्रहांकडून मिळणाऱ्या हवामानविषयक नोंदींचे विश्लेषण उपलब्ध झाले असते तर गारपिटीचे नुकसान कमी करण्याची शक्यता निर्माण झाली असती. गारपीट रोखता येत नाही, मात्र आगाऊ अंदाज मिळाला असता तर काळजी घेता आली असती, असे तज्ज्ञांचे मत अाहे.    

 
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) ११ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत विदर्भ- मराठवाड्यात गारपीट आणि पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र विदर्भ-मराठवाड्यात नेमक्या कोणत्या जिल्ह्यांत गारपीट होऊ शकते आणि कधी होणार याचा अंदाज ‘आयएमडी’ने दिला नव्हता. स्थानिक पातळीवरील अंदाज व्यक्त करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाचा अभाव हे त्यामागचे कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  


गारपिटीसारख्या तीव्र संकटाचे भाकीत ‘आयएमडी’ने केल्यानंतर सरकारी यंत्रणेकडून प्रचार- प्रसाराचे काम होणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेवर ही जबाबदारी असते. या यंत्रणांकडून हे प्रयत्न पुरेशा प्रमाणात झाले नाहीत. त्यामुळे नुकसानीची तीव्रता वाढली. साधारणतः मार्च-एप्रिलमध्ये गारपिटीची शक्यता असते. यंदा फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच गारपिटीचा धोका निर्माण झाला. त्यामुळे रब्बीच्या उभ्या पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  


विज्ञान अभ्यासक डॉ. श्रीकांत कार्लेकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, ‘आताची गारपीट ‘अवकाळी’ म्हणावी लागेल. तापमानात एकदम बदल होतो तेव्हा गारपिटीचा धोका वाढतो. गारपीट ही मुख्यतः स्थानिक हवामान बदलामुळे घडून येणारी प्रक्रिया आहे. वाऱ्यांचे प्रवाह आणि त्यासोबत येणारे बाष्प यांचा त्यावर मोठा प्रभाव पडतो. त्यातही भारत उष्णकटिबंधीय देश असल्याने येथे तापमान आणि वाऱ्यांच्या प्रवाहात सतत बदल होत असतात. समशीतोष्ण प्रदेशाप्रमाणे आपल्याकडे हवामान बदलांचा वेध घेणे सोपे नसते. मात्र वाऱ्यांची दिशा, वेग, बाष्पाचे प्रमाण यावरून गारपिटीचा अंदाज येतो.’ हवामान खात्याच्या सूत्रांनीही या मतास दुजोरा दिला. त्यांनी सांगितले, की ‘पश्चिम आणि पूर्वेकडून आलेल्या वाऱ्यांचे प्रवाह एकमेकांमध्ये मिसळले. सांद्रीभवनामुळे गारा निर्माण झाल्या.’  


प्रगत देशांनाही दरवर्षी बसताेय एक अब्ज डाॅलर्सचा फटका
दरवर्षी गारपिटीचा तडाखा बसून नुकसान हाेते.  गारपीट रोखण्याचे प्रयोग रशिया, सर्बिया या काही देशांनी केले आहेत. रडार आणि सॅटेलाइटच्या माध्यमातून गारपिटीचा अंदाज आल्यानंतर रॉकेटच्या माध्यमातून ढगांवर रसायनांचा फवारा केला जातो. यामुळे ढगांमधील बाष्प गारेच्या स्वरूपात न पडता त्याचे रूपांतर पावसात होते. पाऊस पडल्याने गारा निर्मितीसाठी पुरेसे बाष्प ढगात शिल्लक राहत नाही. त्यामुळे गारपिटीचा धोका टळतो. यासाठी विशेष रॉकेट यंत्रणाही रशियाने बसवली आहे. मात्र या खर्चिक प्रयत्नांना लक्षणीय यश लाभलेले नाही. अमेरिकेसारख्या प्रगत देशालाही दरवर्षी गारपीट-वादळांमुळे एक अब्ज डॉलर्सचा आर्थिक फटका बसतो, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली.  

बातम्या आणखी आहेत...