आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवादी चळवळीतूनच पुण्यातील एल्गार परिषदेला ‍‍मिळाले अार्थिक पाठबळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-  काेरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी पुणे पाेलिसांनी बुधवारी नागपूर, मुंबई व दिल्लीतून अटक केलेल्या ५ जणांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा दावा पाेलिसांनी केला अाहे. या आरोपींकडे सापडलेल्या कागदपत्रांतील नोंदी पाहता पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेस नक्षलवाद्यांकडून अर्थसाहाय्य देण्यात अाल्याचे स्पष्ट हाेत आहे, असा दावा सहपाेलिस अायुक्त रवींद्र कदम यांनी केला.

 

दरम्यान, ५० लाखांचे इनाम असलेला फरार जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याने दिल्लीतील अापली साथीदार राेना विल्सनला लिहिलेले एक पत्रही हाती लागले अाहे.  त्यात दलित अांदाेलन व्यापक करण्यासाठी हिंदुत्ववाद्यांच्या विराेधातील दाेन राजकीय पक्ष व महाराष्ट्रातील एका बड्या दलित नेत्याने अार्थिक व कायदेशीर पाठबळ पुरवण्याचे मान्य केल्याचा उल्लेख अाहे.


बंदी घातलेल्या सीपीआयची संबंध

या पाच अाराेपींकडून महत्त्वपूर्ण दस्तएेवज, पत्रके, लॅपटाॅप, हार्ड डिस्क जप्त करण्यात अाली आहे. गडलिंग यांच्याकडील हार्ड डिस्क व दिल्लीतील राेना विल्सन याच्याकडील हार्ड डिस्कची

फाॅरेन्सिक क्लाेन काॅपीजची छाननी करण्यात अाली.या छाननीत या दोघांचे सीपीअाय (माअाेवादी) या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे पुरावे सापडले आहेत. या दाेघांनी एल्गार परिषदेचे अायाेजक सुधीर ढवळे यांच्यासाेबत संपर्क प्रस्थापित केल्याचे पुरावेही सापडले.


शोमा सेन, राऊतचे माओवाद्यांशी धागेदोरे

नागपूर येथील शाेमा सेन व महेश राऊत यांचेही प्रतिबंधित माअाेवादी संघटनेसाेबत संबंध असल्याचे निदर्शनास अाले अाहे. एल्गार परिषदेच्या अायाेजकांच्या पूर्वीच्या हालचाली तपासल्या असता माअाेवादी संघटनेचे काही वरिष्ठ नेते त्यांच्या संपर्कात असल्याचेही स्पष्ट झाले अाहे. या प्रकरणी अाराेपींवर बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) अधिनियमाचे कलम १३, १६, १७, १८, १८ (ब), २०, ३९ नुसार गुन्हे दाखल केले अाहेत.

 

आरोपींना १४जूनपर्यंत कोठडी
राेना विल्सन, सुधीर ढवळे, शाेमा सेन, महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग या ५ जणांना बुधवारी अटक झाली हाेती. विशेष जज ए. एस. भैलसारेंनी १४ जूनपर्यंत त्यांना पाेलिस काेठडी सुनावली. अाराेपींना २४ तासांत कोर्टात हजर करणे गरजेचे हाेते. यापैकी नागपूरहून गडलिंग यांना बुधवारी सकाळी ६ वाजता अटक झाली हाेती. त्यामुळे गुरुवारी पहाटे ६ वाजता त्यांना कोर्टात हजर केले. उर्वरित चाैघांना दुपारी सुनावणीसाठी आणले होते.

 

गडलिंग यांच्या पत्नीची खंडपीठात धाव

माओवादी समर्थक अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या अटकेच्या विरोधात त्यांच्या पत्नीने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.  गडलिंग, शोमा सेन व महेश राऊत यांना नागपुरातून अटक झाली हाेती. या तिघांवरील कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप नागपुरातील वकिलांच्या संघटनेने केला आहे. गडलिंग यांची पत्नी मीनल यांनी ही कारवाई रद्द करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली अाहे.  या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. मीनल गडलिंग यांच्या वतीने अॅड. निहालसिंग राठोड यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.