आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्य संमेलनाध्यक्षपदी कीर्ती शिलेदार यांची निवड; जून महिन्यात होईल ९८ वे नाट्यसंमेलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका - अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांची निवड करण्यात आली आहे. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत एकमताने कीर्ती शिलेदार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

 

अध्यक्षपदासाठी कीर्तीताईंसह श्रीनिवास भणगे आणि सुरेश साखवळकर अशी एकूण तीन नावे परिषदेकडे आली होती. कीर्ती यांचे नाव नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे सुचवण्यात आले होते. नाट्य संमेलन यंदा जून महिन्यात मुंबईत संपन्न होईल. हे ९८ वे संमेलन आहे, अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी दिली. कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून संगीत रंगभूमी गाजवली आहे. विविध संगीत नाटकांचे त्यांनी चार हजारांहून अधिक प्रयोग सादर केले आहेत. देशविदेशात संगीत नाटकांचे प्रयोग, नाट्यपदांच्या मैफली, सप्रयोग व्याख्याने त्यांनी दिली आहेत. पारंपरिक संगीत नाटकांप्रमाणेच स्वरसम्राज्ञी, अभोगी, मंदोदरी आदी वेगळ्या धाटणीची नाटकेही त्यांनी आपल्या स्वराभिनयाने गाजवली आहेत. 

   
रंगभूमीचा आशीर्वाद : शिलेदार  
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे, हा संगीत रंगभूमीचा आशीर्वाद आहे. आम्ही संगीत रंगभूमीसाठीच जगलो, जगत राहू..अशा शब्दांत नवनिर्वाचित नाट्य संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी मनोगत मांडले. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्तीताईंची निवड झाल्याचे वृत्त पोहोचले तेव्हा कीर्तीताई महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ कार्यक्रमात व्यासपीठावर होत्या. ही आनंदाची बातमी त्यामुळे लगेच जाहीर करण्यात आली आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला. 

   
आई -नाना यांनी संगीत रंगभूमीचेच संस्कार आम्हाला दिले. नव्या पिढीकडे तेच सुपूर्द करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अध्यक्षपदाचा मान आनंददायी आहे, असे कीर्तीताई म्हणाल्या. पुण्यातील गप्पांच्या कार्यक्रमात कीर्तीताईंची मुलाखत घेणारे सुरेश साखवळकर हे नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे एक उमेदवार होते. हाही योग वेगळा ठरला. जयमालाबाई नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष असताना मच्छिंद्र कांबळी परिषदेचे अध्यक्ष होते. आता कीर्तीताई अध्यक्षपदी येत असताना त्यांचे पुत्र प्रसाद हे नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत.

 

आई आणि मुलीची योगायोगांची मालिका   
नाट्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात आई आणि कन्या या दोघींनाही नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळण्याचा योग यानिमित्ताने जुळून आला. २००३ मध्ये संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका- अभिनेत्री जयमाला शिलेदार यांना नाट्य संमेलनाध्यक्षपद मिळाले होते. त्यानंतर त्यांच्या कन्या आणि संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायिका - अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला. 

बातम्या आणखी आहेत...