आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मनसेचे खळ्ळखट्याक..PVR थिएटरच्या कर्मचाऱ्याला मारहाण, 5 रुपयांचा पॉपकॉर्न 250 रुपयांना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - हायकोर्टाने आदेश देऊनही खाद्यपदार्थ अवाच्या सव्वा दराने विक्री होत असल्याच्या कारणामुळे पुण्यात मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. पीव्हीआर या मल्टिप्लेक्समध्ये मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्यकर्त्यांनी खळ्ळखट्याक आंदोलन केले. 

यादरम्यान, मल्टिप्लेक्सच्या कर्मचाऱ्याला मारहाणही करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि.28) संध्याकाळी सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर आयकॉन या मल्टिप्लेक्समध्ये घडली. पीव्हीआर आयकॉन या मल्टिप्लेक्समध्ये मिळणारे खाद्यपदार्थांवर हे चढ्या दराने विक्री होत असल्याचा आरोप करत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या नेतृत्वात अॅड. किशोर शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी, पुणे संघटक सागर पाठक तसेच मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यातील PVRमध्ये आंदोलन केले. 

 

PVRचा मॅनेजर मराठी येत नाही म्हणाला, म्हणून मनसे स्टाइलने उत्तर

मुंबई हायकोर्टाने प्रेक्षकांना स्वत:चे पाणी व अन्न सोबत नेण्याची परवानगी देण्यात यावी, असा स्पष्ट आदेश दिलेला असूनही मल्टिप्लेक्स मालक तो पाळत नाहीत. यासंबंधी मनसे कार्यकर्त्यांनी थिएटरच्या मॅनेजरला संबंधित वृत्त वाचायला सांगितले. यावर मॅनेजरने मला मराठी वाचता येत नाही, असे उत्तर दिल्याने त्याला मनसे स्टाइलने उत्तर दिल्याचे मनसेचे अॅड.  किशोर शिंदे यांनी वृत्तसंस्थेला सांगितले आहे.

 

5 रुपयांचा पॉपकॉर्न 250 रुपयांना

5 रुपयांचा पॉपकॉर्न 250 रुपयांना कसा? 10 रुपयांचा वडापाव शंभर रुपयांना कसा? असे फलक हातात घेऊन व घोषणा देऊन मनसैनिकांनी PVR दणाणून सोडले. PVR प्रशासनाला याबाबत निवेदनही देण्यात आलं. या वेळी येथील कर्मचाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्या व्हिडिओ व्हायरल होत आहे.
तथापि, यापूर्वीही बऱ्याच वेळा महागड्या खाद्यपदार्थांच्या प्रश्नावर आवाज उठवूनही मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाने काहीही कारवाई केली नाही म्हणून अखेर मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे सांगण्यात आले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित Video व आणखी Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...