आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस चमच्याने दुध पित होते तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते- तटकरेंचा \'हल्लाबोल\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वारजे येथील सभेत बोलताना अजित पवार... - Divya Marathi
वारजे येथील सभेत बोलताना अजित पवार...

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप- शिवसेनेच्या सरकारविरोधात काढलेले हल्लाबोल आंदोलन यात्रा आज पुण्यात पोहचली. मंगळवारी सायंकाळी भोसरीत अजित पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला. तर बुधवारी सायंकाळी वारजे येथे जाहीर सभा झाली. त्यानंतर रात्री आठ वाजता काळेवाडी येथे अजित पवारांची जाहीर सभा होत आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील हल्लाबोल यात्रेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, खासदार वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे आदी प्रमुख नेते उपस्थित आहेत. या हल्लाबोल आंदोलनाच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात 2 एप्रिलला कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन झाली होती. गुरूवारी पुण्यातील हडपसर येथील सभेने या टप्प्याची सांगता होईल.

 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. तटकरे म्हणाले, भाजपच्या महामेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी फक्त पवार साहेबांवर टीका करण्यात धन्यता मानली. सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्री महोदय, जर सूर्यावर थुंकाल तर तुमचीच जीभ जळेल. तुम्ही चमच्याने दुध पित होतात तेव्हा पवार साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. भाजपने तीन साडे वर्षांत सरकार चालवले की मनोरंजन केले हेच कळत नाही. या कालावधीत यांनी लोकांची फक्त फसवणूक केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे बोलण्याचा सोयीस्कर कार्यक्रम या सरकारने राबवला आहे. या सरकारला खाली खेचणे आता गरजेचे झाले आहे, असे तटकरे यांनी सांगितले.

 

कामशेत येथे बोलताना अजित पवार म्हणाले, सत्तेमधील सर्वच लोक फसवणूक करणारे आहेत. या सरकारने सर्व आश्वासनांबाबत मोठा यु टर्न घेतला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 लाखांचा कोट घालतात. ते म्हणतात मी चौकीदार आहे. मग चौकीदार एवढे महाग कपडे कसे घालतात? संपूर्ण देशाचे भगवीकरण करणे सुरू आहे. घरांना भगवा रंग दिला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोटाचा रंग भगवा केला आहे. लोकांनी आक्षेप घेतला तेव्हा रंग बदलला गेला. या सरकारने दहावीच्या पुस्तकात राजकीय पक्षांचा उल्लेख केला आहे. भाजपचा इतिहास रंगवून सांगितला गेला आहे. भाजप-सेनेचे उदात्तीकरण केले गेले आहे. मुलांना चुकीचा इतिहास शिकवणे योग्य नाही, असे टीकास्त्र अजित पवारांनी सोडले.

 

1 डिसेंबर 2017 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निष्क्रिय भाजप-सेना सरकारविरोधी हल्लाबोल आंदोलन पुकारले आहे. विदर्भात 156 किलोमीटरची पदयात्रा काढत सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दखल घ्यायला लावली. त्यानंतर मराठवाडयामधील हल्लाबोल आंदोलनामध्ये झालेल्या विराट अशा सभांमधून जनतेने सरकारविरोधी कौल दिला आहे. जनता सरकारविरोधी राष्ट्रवादीसोबत रस्त्यावर उतरलेली यावेळी पहायला मिळाली. त्यानंतर तिसरा टप्पा हा उत्तर महाराष्ट्रात पार पडला. या हल्लाबोल आंदोलनामध्येही जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत खांदयाला खांदा लावत रस्त्यावर येऊन सरकारविरोधी तीव्र संताप व्यक्त करताना दिसली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर येत असेल तर आम्हीही मागे नाही अशी भावना जनतेने व्यक्त करत राष्ट्रवादीच्या आंदोलनाला प्रतिसाद दिला.

 

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असे तीन टप्पे पार करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जनतेशी थेट संवाद साधला. त्यामुळे रोज होणाऱ्या सभांना जनतेने प्रतिसाद दिला.

 

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता समारंभाच्या जाहीर सभांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहून त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे भाजप-सेना या युती सरकारच्याविरोधात वातावरण निर्मिती करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वी झाला आहे. आता चौथ्या टप्प्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...