आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाेकसभेला ‘टेन प्लस’ जागांसाठी ‘राष्ट्रवादी’च्या राज्य नेतृत्वात बदल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -  पक्षाचे दिल्लीत वजन वाढवण्यासाठी महाराष्ट्रातून दहापेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवले आहे. याचाच भाग म्हणून प्रदेशाध्यक्षपदाचा खांदेपालट करण्याबरोबरच संभाव्य जागावाटपात काँग्रेसवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेससोबत आघाडी झाल्यास जागावाटपात राज्यात लाेकसभेच्या २० पेक्षा जास्त जागा लढवण्याची राष्ट्रवादीची तयारी अाहे. 


सन २०१९ मध्ये त्रिशंकू चित्र झाल्यास भाजपेतर पक्षांची आघाडी बांधून सत्ता स्थापनेचा पर्याय पुढे येईल. सपा, बसपा, तृणमूल, बिजू जनता दल, द्रमुक, अद्रमुक, तेलुगू देसम या प्रादेशिक पक्षांइतके खासदार निवडून आणणे ‘राष्ट्रवादी’ला शक्य नाही. परंतु आघाडीचा सर्वसहमतीचा नेता निवडण्याची वेळ आल्यास चमत्कार घडू शकतो, असा ‘राष्ट्रवादी’चा होरा आहे. या दृष्टीने ‘राष्ट्रवादी’ने लोकसभेतले बळ वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सुनील तटकरे यांना रायगडमध्ये ताकद लावता यावी म्हणून प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मोकळे केले. याच वेळी पश्चिम महाराष्ट्रातल्या जयंत पाटील यांच्याकडे या पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. हा निर्णय पूर्णतः पवार यांचा एकट्याचा होता. धनंजय मुंडे यांचे पक्षातले नवखेपण आणि आधीच त्यांच्याकडे असणारे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेतेपद या पार्श्वभूमीवर पुन्हा त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्यास पक्षात नाराजी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे मुंडे यांचे नाव शर्यतीतच नव्हते, असे सूत्रांनी सांगितले.  


ग्रामीण अर्थव्यवस्था- कृषी- सहकार, शहरी प्रश्नांबद्दलची सखोल जाण व ‘मराठा कार्ड’ यामुळे पाटील यांची निवड सोपी झाली. आमच्याकडे निर्णय चटकन होतात. बैठकीत प्रफुल्ल पटेल सांगतात, ‘आपण असे करुयात.’ काय करायचे हे पवारांनी आधीच त्यांना सांगितलेले असते. त्यामुळे पटेलांच्या म्हणण्याला कोणी विरोध करण्याचा प्रश्न आला नाही. पाटील यांची निवड बिनविरोध झाली अशी माहिती ‘राष्ट्रवादी’च्या ज्येष्ठ नेत्याने  दिली. 

 

‘राष्ट्रवादी’चे लक्ष्य  
बारामती, कोल्हापूर, माढा, सातारा (महाराष्ट्र), कटिहार (बिहार) आणि लक्षद्वीप या सहा लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसने सन २०१४ मध्ये जिंकल्या होत्या. पक्षस्थापनेपासून २००४  मध्ये ‘राष्ट्रवादी’चे सर्वाधिक ९ खासदार महाराष्ट्रातून निवडून आले होते. ही कामगिरी उंचावण्याचे लक्ष्य ‘राष्ट्रवादी’ने ठेवले आहे. २०१९ मध्ये आताच्या चार जागांसह रायगड, मावळ, शिरोळ, खेड, उस्मानाबाद, बीड, जालना, लातूर, नाशिक, नगर, गोंदिया, नवी मुंबई या तसेच मुंबई शहरातून एखादी जागा जिंकण्याचे ‘राष्ट्रवादी’चे ध्येय असेल. अजित पवारांसारख्या नेत्याचे लक्ष्य विधानसभा निवडणुकीत क्रमांक एकचा पक्ष बनून मुख्यमंत्रिपद काबीज करणे आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेससोबत आघाडी तर व्हावी, मात्र जागावाटप मनासारखे व्हावे यासाठी आतापासूनच दबाव टाकण्याचे ‘राष्ट्रवादी’चे तंत्र आहे. 

 

पवारांचा धूर्तपणा, अजितदादांना शह  
आर. आर. किंवा छगन भुजबळ या माजी प्रदेशाध्यक्षांप्रमाणे झंझावात निर्माण करण्याची क्षमता जयंत पाटील यांच्याकडे नाही. मात्र भ्रष्टाचाराचा थेट आरोप नसलेला, राज्य पातळीवरची जाण असलेला, उच्चशिक्षित ज्येष्ठ चेहरा पक्षात दुर्मिळ आहे. या मुद्द्यावर जयंत पाटील यांना पक्षात स्पर्धा नव्हती. १९९० पासून सलग सहा वेळा आमदार म्हणून निवडून येणाऱ्या जयंत पाटील यांना अजित पवारसुद्धा धाकात ठेवू शकत नाहीत. सुनील तटकरे यांच्याप्रमाणे जयंतराव हे मात्र अजितदादांच्या कह्यात राहणारे प्रदेशाध्यक्ष ठरू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी त्यांना प्राधान्य दिल्याचे सांगण्यात येते. यदाकदाचित भविष्यात अजित पवार यांच्याविरोधातल्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास दुसऱ्या क्रमाकांचा नेता म्हणून जयंत पाटील पुढे येऊ शकतात. ‘स्वतःचा मुलगा म्हणून, घरातल्याप्रमाणे पवार साहेब माझ्यावर विश्वास टाकतात,’ या शब्दांत जयंत पाटील यांनी पवारांबरोबरच्या त्यांच्या नात्यावर प्रकाश टाकला आहे हे विशेष.    

बातम्या आणखी आहेत...