देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या / देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठ; गतवर्षीच्या तुलनेत एका क्रमांकाची वाढ

देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची २०१८ सालची यादी (राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन) केंद्रीय मनुष्यबळ संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे जाहीर केली. या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात नववे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे विद्यापीठ गेल्या वर्षीच्या तुलनेत एक क्रमांकाने पुढे सरकले आहे. त्याचबरोबर विद्यापीठाने गेल्या वर्षीच्या ५२.८१ या गुणांमध्ये वाढ करून या वर्षी ५८.२४ गुण मिळवले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पहिल्या दहा विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवणारे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे.

Apr 04,2018 02:00:00 AM IST

पुणे- देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची २०१८ सालची यादी (राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन) केंद्रीय मनुष्यबळ संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे जाहीर केली. या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात नववे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे विद्यापीठ गेल्या वर्षीच्या तुलनेत एक क्रमांकाने पुढे सरकले आहे. त्याचबरोबर विद्यापीठाने गेल्या वर्षीच्या ५२.८१ या गुणांमध्ये वाढ करून या वर्षी ५८.२४ गुण मिळवले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पहिल्या दहा विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवणारे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे.


देशातील शैक्षणिक संस्थांची क्रमवारी ठरवताना विद्यापीठे, सर्व संस्था, अभियांत्रिकी, महाविद्यालये, व्यवस्थापन, फार्मसी, वैद्यकीय, स्थापत्यशास्त्र व कायदा असे एकंदर नऊ गट निश्चित करण्यात आले होते. त्यांचा दर्जा ठरवण्यासाठी विविध निकष ठरवण्यात आले होते. त्यात अध्यापन, अध्ययन व संसाधने, संशोधन आणि व्यावसायिकता, व्याप्ती व सर्वसमावेशकता, आकलन क्षमता आणि पदवीसंदर्भातील निकाल अशा निकषांचा समावेश आहे. त्यांच्या परीक्षणातून मंत्रालयाकडून ही यादी तयार केली जाते. विद्यापीठांच्या गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ५८.२४ गुणांसह नववे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दहाव्या क्रमांकावर होते. सर्व संस्थांच्या गटामध्ये (ओव्हर ऑल) विद्यापीठाने १६ वे स्थान मिळवले आहे.


विद्यापीठाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन काही प्रमाणात सुधारला आहे. या निकषावर गेल्या वर्षी विद्यापीठाला ११.२० गुण होते. त्यात वाढ होऊन यावर्षी १५.०४ गुण मिळाले आहेत. या यादीत बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेने गेल्या वर्षीप्रमाणेच पहिला क्रमांक मिळवला आहे.

दहा सर्वोत्कृष्ट विद्यापीठ

- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (बंगळुरू)
- जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (नवी दिल्ली)
- बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (वाराणसी)
- अण्णा युनिव्हर्सिटी (चेन्नई)
- युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद (हैदराबाद)
- जादवपूर युनिव्हर्सिटी (कोलकाता)
- युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली (दिल्ली)
- अमृता विश्व विद्यापीठ (कोईमतूर)
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पुणे)
- अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी (अलीगढ)

सर्वांच्या प्रयत्नांचे फलित
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुधारलेले मानांकन ही अत्यंत आनंदाची बाब असून, विद्यापीठ दर्जेदार शिक्षणाकडे वाटचाल करत असल्याचेच हे निदर्शक आहे. हे विद्यापीठाच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या प्रयत्नांचेच फलित आहे. या सुधारलेल्या मानांकनामुळे विद्यापीठाला “इन्स्टिट्यूशन ऑफ एमिनन्स”चा दर्जा मिळवण्यासाठी फायदाच होईल. लोकांचा विद्यापीठाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सुधारत आहे.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू

X