आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- ८ नोव्हेंबर २०१८ पासून महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. याचे औचित्य साधून महाराष्ट्रात साजरा होणारा ‘पुलोत्सव’ आता राज्याबाहेरील शहरांत आणि जगभरातील पाच खंडांतील ३० शहरांतून साजरा होणार आहे. आशय सांस्कृतिक, पुल परिवार आणि पुण्यभूषण फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने पुलंचे जन्मशताब्दी वर्ष देशविदेशांत साजरे केले जाणार आहे.
आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, पुण्यभूषण फाउंडेशनचे डॉ. सतीश देसाई यांनी गुरुवारी ही माहिती दिली. या वेळी ‘ग्लोबल पुलोत्सव’च्या बोधचिन्हाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते करण्यात आले. ग्लोबल पुलोत्सवासाठी मान्यवरांची सल्लागार आणि कार्यसमिती असेल. वर्षभरातील कार्यक्रमांतून सुमारे ५०० कलाकार सहभागी होतील. त्या त्या शहरांतील स्थानिक संस्था, कलाकार, लेखकांनी संधी दिली जाईल. दर्जेदार प्रकाशने, लघुपट प्रदर्शन केले जाईल. पुलंचे आजही अप्रकाशित असणारे लेखन व अन्य कार्य रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाईल. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक महानगरपालिकांसह विदेशातील महाराष्ट्र मंडळे यांचेही सहकार्य पुलोत्सवाला असेल, असे चित्राव, जकातदार व डॉ. देसाई म्हणाले.
पुलंनी सादर केलेल्या काही अभिजात सादरीकरणांचे पुनरुज्जीवन करण्याचा आयोजकांचा मानस आहे. बैठकीची लावणी, कवितावाचन, अभिवाचन, अनुवाद, रवींद्रनाथ..आदी सादरीकरणांचा त्यात समावेश असेल. राज्यात पुणे, मुंबईसह औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, नगर, जळगाव, अमरावती या शहरांतही पुलोत्सव होणार आहे. युरोप, आशिया, अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथेही पुलोत्सव रंगेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.