आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅकसारखे मूल्यांकन करून दर्जाहीन शाळा बंद करणार;मनुष्यबळ विकासमंत्री जावडेकरांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू अाहेत. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभार सुधारण्यासाठी महाविद्यालयांप्रमाणे शाळांचेही “नॅक’सारख्या संस्थांकडून मूल्यांकन केले जाईल.  ज्या शाळा गुणवत्तेचे पालन करणार नाहीत, त्या  बंद करण्याची कडक कारवाईही करण्यात येईल. शिक्षणात संशोधन, नावीन्य यावर भर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. रोजगारक्षम, कौशल्यपूर्ण शिक्षण समाजाला मिळाले, तर देशाचा विकास गतीने होईल,’ असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी सांगितले.


भारतीय छात्र संसदेच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, आध्यात्मिक गुरू स्वामी चिदानंद सरस्वती, महात्मा गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, उद्योजक राजीव बजाज अादी उपस्थित होते. या वेळी कर्नाटक विधान परिषदेचे सभापती डी. एच. शंकरमूर्ती यांना ‘आदर्श सभापती’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र व एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप अाहे.


जावडेकर म्हणाले,  घराण्याची परंपरा, पैशाचे पाठबळ किंवा मनगटशाही नसतानाही नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. या उदाहरणापासून प्रेरणा घेऊन युवकांनी राजकारणात यावे. गुणवत्ता आणि मेहनत यांच्या जोरावर तेही उच्चपद प्राप्त करू शकतील. मात्र, त्यासाठी सतत मेहनत, प्रवास व काम करण्याची इच्छाशक्ती हवी. दहशतवाद, भ्रष्टाचार, जातीयवाद, संप्रदायवाद, अस्वच्छता यापासून भारताला मुक्त करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. पाच वर्षांत ही सर्व उद्दिष्टेे पूर्ण करायची असून त्यामध्ये वाढता लोकसहभाग समाधानकारक आणि प्रेरक आहे. तरुणांनी राजकारणाकडे करिअर म्हणून पाहावे,’ असेही ते म्हणाले. शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि त्याकडे चांगले करिअर म्हणून पाहण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेच्या धर्तीवर भारतीय राजकारण सेवा अर्थात इंडियन पॉलिटिकल सर्व्हिस (आयपीएस) आणली पाहिजे. युवाशक्तीला कोणत्याही मुद्द्यावर आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याचा वापर करून आपल्यातील प्रतिभा, राजकारणी गुण पारखले पाहिजेत. विद्यार्थ्यांतील गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे.

बातम्या आणखी आहेत...