आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी - गुजराती भाषाभगिनी पण, अनुवादाचा प्रवाह अडखळताच; गुजराती भाषेतील पुस्तकांचे मोजकेच अनुवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गुजरातमधील बडोदा येथे सुरू झाले आहे. गुजरातमधील मराठी मंडळींची संख्याही लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर मराठी आणि गुजराती भाषाभगिनींमधील आदानप्रदान मात्र अद्याप अडखळते आहे. त्यातही मराठी पुस्तकांचे गुजराती भाषेतील अनुवाद अधिक संख्येने उपलब्ध आहेत, पण गुजराती भाषेतील फारच मोजकी पुस्तके मराठी भाषेत अनुवादित झाल्याचे निदर्शनास आले आहे. 


मराठीतून गुजरातीमध्ये आणि गुजरातीतून मराठी भाषेत अनुवाद करणाऱ्या संजय भा‌वे आणि अरुणा जोशी या अभ्यासक– अनुवादकांनी ही माहिती दिली. भावे आणि जोशी ही मूळची मराठी मंडळी, पण कित्येक वर्षांपासून गुजरातमध्ये राहिलेली, तिथेच शिकलेली, गुजराती माध्यमातून शिकलेली. त्यामुळे  मराठी आणि गुजराती दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणारी. वृत्ती अभ्यासकाची असल्याने दोन्ही भाषांतील दर्जेदार लेखनाकडे आ‌वर्जून लक्ष देणारी. पण अनेक वर्षांच्या  त्यांच्या  अभ्यासाचा उपरोक्त निष्कर्ष मराठी आणि गुजराती दोन्ही भाषांच्या  संदर्भात चिंतनीय आहे. प्रा. भावे अहमदाबादमधील  कॉलेजमध्ये  इंग्रजीचे अध्यापन करतात. त्यांनी लक्ष्मण माने यांची उपरा, साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि  डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रकाशवाटा ही पुस्तके मराठीतून गुजरातीमध्ये अनुवादित केली आहेत. अरुणा जोशी यांनी गुजराती भाषेतील दलित कथांचे मराठीत अनुवाद केले. 

 

गुजरातीतून मराठीत प्रमाण कमी
अरुणा जोशी म्हणाल्या,‘मराठीतील पुस्तके गुजराती भाषेत अधिक संख्येने अनुवादित होतात, पण गुजराती भाषेतील उत्तम लेखन मराठी भाषेत अनुवादित होण्याचे प्रमाण मोजके आहे. ही संख्या दोनशे पुस्तकांच्या वर जात नाही. उत्तम अनुवादकांची संख्या कमी असल्याने आणि  मराठी वाचकांना गुजरातीमधील साहित्याची उत्सुकता नसल्याने असे होत आहे. - अरुणा जाेशी

 

प्रकाशकही अनुत्सुक
‘मराठी भाषेत चरित्रात्मक तसेच आत्मचरित्रात्मक लेखनाचा जसा विकास दिसतो, तसा गुजराती भाषेत दिसत नाही. मात्र अनुवादकांची संख्या कमी हे दुखणे आहे. प्रकाशकही अशा अनुवादांसाठी उत्सुक नसतात. 
- संजय भावे

 

यांचे ‌श्रेय
अरुणा जोशी, अंजनी नरवणे, सुषमा लेले, स्मिता भागवत, सुधीर कौठाळकर, अरुणा जाडेजा, मृणालिनी देसाई, उमाकांत ठोंबरे, श्रीपाद जोशी, निर्मला प्रधान, सुरेश दलाल, जयंत परमार, जया मेहता, किशोर गौड, प्रतिभा दवे, संजय भावे

 

नवीन प्रकल्पांचे काम सुरू
गुजराती भाषेत मराठीप्रमाणेच  विविध साहित्यप्रकारांत लेखन केले जाते. युवा पिढीतही चांगले लेखन करणारे लेखक आहेत. पण ज्या गतीने, संख्येने मराठी पुस्तकांचे गुजराती भाषेत अनुवाद होतात, त्या तुलनेत गुजराती पुस्तके मात्र मराठी भाषेत अनुवादित होत नाहीत. डॉ. गणेश देवी यांच्यासारख्या ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञांच्या  मार्गदर्शनाखाली  आता काही प्रकल्पांचे काम सुरू आहे. नजीकच्या भविष्यात  काही दर्जेदार अनुवाद वाचकांपर्यंत पोहाेचतील, अशी आशा अरुणा जोशी आणि संजय भावे यांनी व्यक्त केली. 

 

मराठीतून गुजरातीत अनुवादित झालेली प्रमुख पुस्तके
वि. स. खांडेकरांचे सर्व साहित्य, साने गुरुजींचे सर्व लेखन, मृत्युंजय, राधेय, स्वामी, लक्ष्मीबाई  टिळकांची स्मृतिचित्रे, दुर्गा भागवतांचे व्यासपर्व, इरावती कर्वे यांचे युगांत, डॉ. अरुणा ढेरे यांचे सीता, द्रौपदी, कुंती, इंदिरा संतांच्या कविता, सुनीता देशपांडे यांचे आहे मनोहर तरी, चिं. त्र्यं. खानोलकरांचे कोंडुरा, रात्र काळी घागर काळी, दया पवारांचे बलुतं, भालचंद्र नेमाडेंची कोसला, धनंजय कीर लिखित डॉ. आंबेडकरांचे चरित्र, वीणा गवाणकरांची एक होता कार्व्हर आणि भगीरथाचे वारस, जीएंच्या कथा, विश्वास पाटील यांची पानिपत, महानायक आणि झाडाझडती, आशा बगे यांची भूमी, नसीमा हुजरुक यांचे चाकावरची खुर्ची..

 

 

गुजरातीमधून मराठीत अनुवादित झालेली पुस्तके
सरस्वतीचंद्र, पृथ्वीराजरासो, मुक्ता, करण घोलो, हल्दीघाटीचे युद्ध, पृथ्वीवल्लभ, गांधीजींचे मूळ लेखन, दिव्यचक्षु, छायानट, पूर्णिमा, मानवतेचे पाझर, राखेतील निखारे, जीवी, सम्राट चंद्रगुप्त. महाअमात्य, कथा भारती गुजराती कहाण्या, गुजराती एकांकिका, दीपनिर्वाण, निवडुंगाचे फूल, सात पाऊले आकाशी, शौर्यगाथा सौराष्ट्राची, तुळशीचं रोप, तल्लफ, प्रश्नप्रदेशापलीकडे,

- कालपुरुष,अमृतपंथाचा यात्री... 

बातम्या आणखी आहेत...