आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकऱ्यांचा सागर पुण्यनगरीत: ज्ञानोबा, तुकोबारायाची पालखी पुण्‍यात दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - वाचे विठ्ठल गाईन, नाचत पंढरी जाईन..रंग लावीन अंतरा, हरुनी देहभाव सारा...याची साक्षात प्रचिती देत लक्षावधी वारकऱ्यांचा मेळा वरुणराजाच्या साक्षीने शनिवारी सायंकाळी पुण्यनगरीत दाखल झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास प्रथम जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन झाले, तर सायंकाळी उशिरा माउलींचा पालखी सोहळा पुण्यात आला. आता दोन्ही पालख्यांचा मुक्काम दोन दिवसांसाठी पुण्यनगरीत असून, वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकर सज्ज झाले आहेत.

 

फडफडणारे भगवे ध्वज, दुरूनच ऐकू येणारा टाळ-वीणा-झांजांचा संमिश्र नाद, कानावर येणारा तुकोबांचा-माउलींच्या भक्तिरचनांचा गजर, एका लयीत पडणारी लक्षावधी पावले, मस्तकावरील तुळशीवृंदावने, कपाळी लावलेला टिळा, मुखी हरिनाम अशा स्वरूपाचा वारकऱ्यांचा जथा नेहमीप्रमाणे भारावून टाकत होता. कुठलीही बाह्य यंत्रणा नसूनही स्वयंशिस्तीचे अचाट दर्शन घडवत सुमारे वारकऱ्यांचा हा चमू शांतपणे वाटचाल करत पुण्यातील मुक्कामस्थानी (निवडुंग्या विठोबा आणि भवानी पेठ मंदिर) रवाना झाला.

 

शनिवारी सकाळी आकुर्डी येथून प्रथम तुकोबांच्या पालखी सोहळ्याने पुण्याकडे वाटचाल सुरू केली. तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे यंदा ३३३ वे वर्ष आहे आणि एकूण ३३१ दिंड्यांचा पालखी सोहळ्यात समावेश आहे. सायंकाळी तुकोबांचा पालखी सोहळा वाकडेवाडी परिसरात दाखल झाला. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी पुणेकरांच्या वतीने पालखीचे स्वागत केले.

 

प्लास्टिकमुक्तीचा नारा
पालखी सोहळ्यात यंदा प्रथमदर्शनी जाणवणारी गोष्ट म्हणजे प्लास्टिकमुक्तीचा संदेश देणारे स्वयंसेवक. जवळपास प्रत्येक दिंडीत प्लास्टिक-थर्माकोलबंदीचा संदेश देणाऱ्या स्वयंसेवकांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. तरुणाईचा सहभाग त्यात मोठा होता. पंढरीचा यात्री - प्लास्टिकला कात्री, ही वारीतील सर्वांत लोकप्रिय स्लोगन होती.

 

बातम्या आणखी आहेत...