आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्केटमध्ये नव्या संधी: मराठी भाषेत 5 लाख ब्लॉगर्सची गरज! चांगले अर्थार्जनही शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या जगात 2 कोटी आणि भारतात 40 लाख लोक ब्लॉगलेखन करतात. 5 लाखाहून अधिक मराठी ब्लॉगलेखकांना यामध्ये संधी असून त्यातून चांगले अर्थार्जन करता येणे शक्य आहे. बडोदे येथे भरलेल्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ब्लॉगलेखन कसे करावे या कार्यशाळेमध्ये बोलताना प्रख्यात लेखक, ब्लॉगर आणि साहित्य सेतूचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटुकले यांनी हे प्रतिपादन केले. 

 

ब्लॉगलेखन म्हणजे काय, ब्लॉगलेखन कसे करावे, ब्लॉगलेखनासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान, ब्लॉगलेखनामधून अर्थार्जन कसे करावे आणि यशस्वी ब्लॉग लेखनाचे तंत्र याविषयी त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. प्रत्येक साहित्यिक, कवी आणि लेखकाने आता ब्लॉगलेखक बनले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेले ब्लॉगलेखन हे प्रतिभेच्या प्रवाहाला गती देणारे एक अनमोल वरदान असून त्याद्वारे प्रत्येकाला आता सृजनशील साहित्य निर्मिती करणे सहज शक्य आहे. 

ब्लॉगलेखन हाताळायला सोपे आणि सहज शिकता येण्यासारखे तंत्र आहे. आपले लेखन ब्लॉगच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचविणे आणि वाचकांच्या प्रतिक्रिया तात्काळ आजमावता येणे हे ब्लॉगलेखनाचे अनोखे वैशिष्ट्य आहे. लेखक आणि वाचक यातील अंतर ब्लॉगलेखनाने मिटवून टाकले आहे.

 

“ जे जे आपणासी ठावे । त्यावरी ब्लॉगलेखन करावे ।  शहाणे करून सोडावे । सकल जन ॥ ”

 

सध्या जगात 2 कोटी आणि भारतात 40 लाख लोक ब्लॉगलेखन करतात. 5 लाखाहून अधिक मराठी ब्लॉगलेखकांना यामध्ये संधी असून त्यातून चांगले अर्थार्जन करता येणे शक्य आहे. फक्त लेखकच नव्हे तर कवी, कथा-कादंबरी लेखक, वैचारीक-ललित लेखक, स्तंभलेखक, पत्रकार, विषेश विषयातले तज्ञ पत्रकार, वार्ताहर, विद्यार्थी, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, चित्रकार, व्यंगचित्रकार, फोटोग्राफर, गायक, कलाकार, किर्तनकार, प्रवचनकार, समाजसेवक, राजकिय व्यक्ती, कार्यकर्ते, गृहिणी, पाककला तज्ञ, इतिहास, संस्कृती आणि परंपरा तज्ञ, तंत्रज्ञ, शेतकरी अशा अगदी प्रत्येक व्यक्तीला ब्लॉगलेखनामध्ये अगणित संधी उपलब्ध आहेत.

 

कोणत्या विषयावर आणि कुणासाठी ब्लॉगलेखन करायचे ते निश्चित करून त्या विषयाचा सखोल अभ्यास गरजेचा आहे. अचूक शब्दांमध्ये ब्लॉगची मांडणी, रेखाचित्रे आणि रंगसंगतीद्वारे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. ब्लॉगचे शीर्षक, उपशीर्षक आणि की - वर्डसचा योग्य वापर हे ब्लॉगच्या यशस्वीतेसाठी आवश्यक आहे. आपला ब्लॉग विविध भाषांमध्ये रूपांतरीत करता येवू शकतो.

 

ब्लॉगलेखन हे थोडेसे प्रशिक्षण आणि त्यानंतर सरावाने जमणारे कौशल्य आहे. मराठी भाषेतही आता सहजपणे ब्लॉगलेखन करता येते. ब्लॉगलेखन करताना मोबाईलचा वापर कसा करायचा हे सांगताना त्यांनी फेसबुक आणि ब्लॉगिंग, संकेतस्थळ आणि ब्लॉगलेखन यांच्यातील फरक स्पष्ट केला. ब्लॉगलेखन करताना कोणकोणती उपकरणे आणि कौशल्ये आवश्यक आहेत आणि अत्यंत कमी खर्चामध्ये ब्लॉगलेखक म्हणून कसे करिअर करता येते हे त्यांनी विषद करून सांगितले. या कार्यशाळेला संमेलनार्थींनी गर्दी केली आणि चांगला प्रतिसाद मिळाला. वरदा तांबे यांनी या कार्यशाळेचे सुत्रसंचालन केले. 

 

91 व्या बडोदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यशाळा विभागप्रमुख हर्षा बसरगे आणि सीमा अफिणवाले यांनी या कार्यशाळेचे संयोजन केले होते. या कार्यशाळेला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी भेट दिली आणि बडोदा संमेलनाने कार्यशाळा आयोजित करून एक उपयुक्त पायंडा पाडला आहे, असे कौतुकोद्गार काढले. लवकरच ब्लॉगलेखन कार्यशाळा यू ट्यूबवर उपलब्ध केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...