आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रासपत फूट, जानकरांना प्रदेश सचिवांचेच अाव्हान; भारतीय प्रजा सुराज्य पक्ष स्थापन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘संपत्ती कमावणार नाही, मागच्या दाराने आमदार- खासदार होणार नाही आणि स्वतःचा पक्ष कधी सोडणार नाही,’ असे सांगून लोकांची मने जिंकणाऱ्या कॅबिनेट मंत्री महादेव जानकरांनी आपल्या सर्व प्रतिज्ञा मोडल्या आहेत. जनतेची आणि समाजाची त्यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवूनच दाखवावी, असे आव्हान जानकरांच्याच जुन्या समर्थकांनी त्यांना दिले आहे.  


राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष महादेव जानकर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून ‘राष्ट्रवादी’च्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात तब्बल ४ लाख ५१ हजार मते मिळवून राज्यभर चर्चेत अाले हाेते. या निवडणुकीत जानकरांचे प्रमुख प्रचारक राहिलेले व रासपचे राष्ट्रीय सचिव बारामतीच्याच दशरथ राऊत यांनी अाता मात्र जानकरांची साथ सोडली आहे. धनगर समाज आणि बारामतीच्या मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप जानकरांवर करत राऊत यांनी ‘भारतीय प्रजा सुराज्य पक्ष’ नावाने स्वतंत्र चूल मांडली आहे.  


राऊत यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, ‘२०१४ मध्ये मी जानकरांचा मुख्य प्रचारक होतो. मात्र साडेचार लाखांचे मतदान करणाऱ्या मतदार आणि समाजाशी जानकरांनी बांधिलकी ठेवली नाही. त्यांच्या मंत्रिपदाचा समाजाला कसलाही फायदा झाला नाही. त्यांचा कारभार पाहिल्यानंतर काही महिन्यांतच आम्ही त्यांच्यापासून फारकत घेतली. ‘रासप’च्या पदाधिकाऱ्यांचीही त्यांनी फसवणूक केली. म्हणून आम्ही स्वतंत्र पक्ष स्थापन करून त्याला निवडणूक आयोगाची मान्यता घेतली आहे. जानकरांनी आता बारामतीतून पुन्हा लढून दाखवावेच.’  


‘माढ्यातून पहिल्यांदा निवडणूक लढवताना जानकरांनी ‘फकीर’ अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती. जानकरांच्या खोटारडेपणामुळे पुढे आमचा भ्रमनिरास झाला आणि शेकडो कार्यकर्त्यांनी ‘रासप’सला सोडचिठ्ठी दिली. यात ११ जिल्हाध्यक्ष, ३ विभागप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे,’ असा दावा राऊत यांनी केला. संघटन बळकट करण्यासाठी अापण राज्यभर दौरे करणार असून ११ फेब्रुवारीला बारामतीत मेळावा घेणार आहोत. २०१९ मध्ये माढा, बारामतीसह प्रमुख मतदारसंघातून आम्ही लोकसभा, विधानसभेची निवडणूक लढणार,’ असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यावर महादेव जानकर आता काय बोलतात याकडे त्यांच्या जुन्या समर्थकांसह राज्यभरातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.


जानकरांचे दावे अाणि कार्यकर्त्यांचे आक्षेप  
जानकरांचा दावा :
माझ्या नावावर संपत्ती असणार नाही. 
अाक्षेप  : जानकर यांनी २००९ मध्ये माढ्यातून शरद पवार यांच्याविरोधात लोकसभा लढली. प्रतिज्ञापत्रात त्यांनी अापली संपत्ती शून्य असल्याचे सांगितले. २०१४ मध्ये भाजपच्या पाठिंब्यावर बारामतीतून त्यांनी पुन्हा खासदार होण्याचा प्रयत्न केला. या वेळच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी फोर्ट (मुंबई) येथील फ्लॅटसह ६८ लाख ७४ हजारांची मालमत्ता जाहीर केली. २०१५ मध्ये विधान परिषदेच्या प्रतिज्ञापत्रात नऱ्हे (पुणे) येथे फ्लॅट, पनवेल, कुर्डू (माढा), इंदेवाडी (जालना) येथे बिगरशेती जमीन तसेच मंगळवेढे, टेमघर (जि. पुणे), करोडी (जि. औरंगाबाद) येथे शेतजमीन असल्याचे नमूद केले.


दावा : ‘रासप’ कधी सोडणार नाही  
अाक्षेप  : ‘भाजपचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे,’ असे प्रतिज्ञापत्र सादर करून २०१५ मध्ये जानकर विधान परिषदेवर निवडून गेले. जानकर रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी ते अामदार भाजपचे अाहेत.  


दावा : मागच्या दाराने सत्तापदे भूषवणार नाही 
अाक्षेप  : भाजपकडून विधान परिषदेवर अामदार, त्यांनी दिलेले कॅबिनेट मंत्रिपद. 


दशरथ राऊत यांनी नाकारले ‘पवार कनेक्शन’  
२०१९ मध्ये बारामतीची लोकसभा लढवण्याचा जानकरांचा मनाेदय अाहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचीही माेर्चेबांधणी सुरू अाहे. बारामतीच्या दशरथ राऊत यांनी जानकरांपासून फारकत घेत स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्याचा संबंध पवारांशी आहे का, असा प्रश्न विचारला जात अाहे. मात्र राऊत म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना या सर्वच पक्षांनी जातीयवादी राजकारण केले आहे. भावनिक, जातीयवादी राजकारणापासून आम्ही दूर आहोत. या दाेन्हींपासून स्वतंत्र राहत आम्ही गरीब, मागासांचे संघटन करणार आहोत.’ 

बातम्या आणखी आहेत...