आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुुणे- व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याच्या कल्पक आणि नावीन्यपूर्ण योजना काही प्रेमवीर आखतात आणि धाडसाने त्या पूर्णही करतात. पुणेकर क्रीडाप्रेमी दांपत्य मधुरा आणि मिलिंद शालगर यांनी त्यांच्या सहजीवनाचा रौप्यमहोत्सव तब्बल २५०० किलोमीटर सायकल प्रवास करून साजरा केला आहे. श्रीनगर ते पुणे असा अडीच हजार किमींचा प्रवास या दोघांनी २५ दिवसांत पूर्ण करून परस्परांना व्हॅलेंटाइन डेची अनोखी भेट दिली.
मिलिंद आणि मधुरा शालगर हे क्रीडाप्रेमी दांपत्य २५ वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाले. यंदा त्यांच्या सहजीवनाचाही रौप्यमहोत्सव आहे. हे औचित्य अधोरेखित करण्यासाठी काहीतरी वेगळे करू या, हा विचार गेल्या वर्षापासून मनात होता. ‘सायकलिंगची आम्हा दोघांनाही खूप आवड आहे. आम्ही सायकलवर अनेक सहली केल्या आहेत. त्यामुळे पंचविसावा व्हॅलेंटाइन २५०० किमी सायकलिंग करून साजरा करूया, ही कल्पना सुचली आणि तयारीला लागलो’, असे मिलिंद आणि मधुरा यांनी सांगितले. पुणे - सातारा, पुणे - गोवा, मनाली - लेह असे सायकल ट्रेक आम्ही केले आहेत. त्यामुळे स्वत:च्या क्षमता, मर्यादांची उत्तम जाण होतीच. कुटुंबीयांचे प्रोत्साहन होते, स्नेहीजनांचा भक्कम पाठिंबा, परिश्रमांची तयारी, आत्मविश्वास आणि परस्परांमधील ट्यूनिंग..यांच्या आधाराने आम्ही बेत ठरवला आणि पूर्णही केला. २५ दिवस अहोरात्र एकमेकांच्या साथीने प्रवास करत, अनेक अडचणींना तोंड देत आम्ही परस्परांना एक आगळीवेगळी भेट देऊ शकलो, याचा आनंद खूप मोठा आहे, अशी भावना मधुरा शालगर यांनी दिव्य मराठीशी बोलताना या वेळी व्यक्त केली.
असे केले नियोजन
प्रवासाची तयारी सुमारे दीड वर्षांपूर्वी सुरू केली. उत्तम सायकली होत्याच, एक राखीव सायकल सोबत ठेवली. संपूर्ण प्रवासात इनोव्हा गाडी सोबत ठेवली. त्यात राखीव सायकल, टायर ट्यूब्ज, पाणी, खाद्यपदार्थ, कपडे, प्रथमोपचार, संपर्कयंत्रणा होती. सरावासाठी वर्षभर काही सायकल ट्रेक केले.कारण प्रवासाचा प्रत्यक्ष मार्गही चढउतारांचा होता. नकाशांवरून आधी प्रवासाचा मार्ग ठरवला.
वेगळेपण हवे होते
दरवर्षी आम्ही व्हॅलेंटाइन डे एकमेकांसोबत साजरा करतो. पूर्ण दिवस आम्ही एकमेकांसाठी असतो. यंदा लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे हे वर्ष आणि हा दिवस आमच्यासाठी विशेष होता. तो साजरा करण्यासाठीही काहीतरी वेगळेपण हवे होते. २५०० किमी सायकल प्रवास २५ दिवसांत करण्याचे सुचल्यावर विलक्षण आनंद झाला आणि आज तो पूर्णही झाला, हे समाधान विलक्षण आहे.
मिलिंद शालगर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.