आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात छगन भुजबळांची धडाडली तोफ, भाजपवर \'हल्लाबोल\'!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -   ‘आता बाहेर आलोच आहे तर गप्प बसणार नाही. नुसता बोलणार नाही. लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरणार. बचेंगे तो और भी लढेंगे,’ असा इरादा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी रविवारी व्यक्त केला. भाषणाच्या समाराेपाला ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है,’ हा शेर ऐकवत त्यांनी सरकारविराेधात संघर्ष करण्याचा मनसुबाही जाहीर केला. ‘शरद पवारांना विसरण्याचा प्रश्नच येत नाही’, असे सांगत ‘राष्ट्रवादी’ची साथ सोडणार नसल्याचेही स्पष्ट करत त्यांनी पक्षबदलाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.   


अडीच वर्षांच्या तुरुंगवासानंतर जामिनावर बाहेर आलेले भुजबळ रविवारी (ता. १०) पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १९ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात सहभागी झाले. या वेळी भुजबळ काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार अध्यक्षस्थानी होते. भुजबळांनी गेल्या अडीच वर्षांची कमतरता भरून काढत त्यांच्या परिचित अभिनययुक्त आक्रमक वक्तृत्वशैलीची झलक दाखवत सभेमध्ये जान आणली. भुजबळ बोलण्याआधी रटाळ बनत असलेली राष्ट्रवादीची सभा भुजबळांच्या वक्तव्याने जिवंत झाली. अंगात पांढरे कपडे, राखलेली पांढरी दाढी, कलप न केलेले डोक्यावरचे पांढरे केस आणि गळ्यात काळा मफलर अशा वेशात भुजबळ व्यासपीठावर अाले तेव्हा उपस्थितांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.   

 

‘कोणी मला वाघ म्हणते. वय झाले म्हणून वाघ गवत खात नाही. कोणी बंदरही म्हणते. बंदर कितना भी बुढा हो गुलाटी मारना नही छोडेगा,’ असे सांगत राजकारणात पुन्हा सक्रिय होणार असल्याचे भुजबळांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. भुजबळ म्हणाले, की हल्लाबोल आंदोलनाचा आज समारोप होत आहे. पण माझ्यावर अडीच वर्षांपूर्वीच ‘हल्लाबोल’ झाला. समीरला आणि मला अटक झाली. धाडींवर धाडी पडल्या. एकाच ठिकाणी सात-सातवेळा धाडी टाकण्यात आल्या. सापडले काहीच नाही. सांगताना मात्र सगळे फुगवून सांगितले गेले. महाराष्ट्र सदनाचे काम शंभर कोटींचे आणि छगन भुजबळांनी साडेआठशे कोटी खाल्ले म्हणून सांगितले. जणू पाच फुटांच्या गाभण म्हशीला पंधरा फुटाचे रेडकू झाले.   


मै जिंदगी का साथ निभाता चला गया -


‘सगळ्या प्रॉपर्ट्या, मालमत्ता जप्त झाली. काही शिल्लक ठेवले नाही. पण लोकांचे प्रेम तुम्ही जप्त करू शकत नाही. ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धूएं मे उडाता चला गया, बर्बादियों का शाैक मनाना फिजूल था, जो मिल गया उसिको मुकद्दर समझ लिया,’ हे साहिर लुधियानवींचे गीत मी तुरुंगात असताना सतत आठवत होतो. आता ‘पुनश्च हरी ओम‘, असे छगन भुजबळ म्हणाले. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास होता आणि आहे. मी निर्दोष सुटणार’, असा दावाही त्यांनी केला.  

 

माेदींवर टाेलेबाजी-

 
- तुरुंगात असताना माझी, माझ्या घरच्यांची सगळी संपत्ती, मालमत्ता, घरे जप्त झाली. तुरुंगाबाहेर आल्यावर म्हटले हरकत नाही माझ्या, माझ्या घरच्यांच्या सगळ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा झाले असतील. आता काय घाबरायचे आहे, असा जोरदार चिमटा भुजबळांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता काढला.   


- येवल्याचे लोक मला सांगायला आले, की आता आम्ही घोड्याचा व्यापार सुरू केला आहे. कारण पेट्रोल-डिझेल महागल्याने गाड्या कोणी वापरतच नाही.   


- सभेला माणसे आणायची होती तर येवल्याची सगळी पोरे गायब. का तर सगळ्यांना नोकऱ्या लागल्या. एकजण रिकामा शिल्लक नाही.  

 

राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आता पुणेरी पगडी नव्हे तर फुले पगडी-

 

सुमारे तीन वर्षांनी पक्षाच्या व्यासपीठावर अालेले छगन भुजबळ यांचे पुणेरी पगडी देऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वागत केले. मात्र भुजबळ यांच्या भाषणानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार उभे राहिले. अापल्या भाषणाची सुरुवातच त्यांनी  पुणेरी पगडीपासून केली. पक्षाच्या पुणे शहराध्यक्षा वंदना चव्हाण आणि पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांचे नाव घेऊन त्यांनी ‘अशी पुणेरी पगडी आपल्या पक्षाच्या व्यासपीठावर देणे योग्य नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच यापुढे मी जी पगडी (पागाेटे) सांगताेय तेच राष्ट्रवादीच्या सर्व कार्यक्रमात वापरले जाईल,’ अशी अादेशवजा सूचना करून त्यांनी तातडीने भुजबळांना महात्मा फुले जसे वापरायचे तसे पागाेटे देण्याची सूचना केली. त्याचे तातडीने अनुकरणही झाले. ही नवीन पगडी भुजबळांच्या डोक्यावर बसल्यानंतरच पवार यांनी पुढील भाषण सुरू केले.

 

मराठा आरक्षणासाठी अाेबीसींसह रस्त्यावर-


‘मराठा आरक्षणाला माझा विरोध असल्याची प्रतिमा निर्माण केली. मंत्रिमंडळात मी कधीही विरोध केला नाही. मराठा आरक्षणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मागणे एवढेच होते, की ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका. महाराष्ट्रात, केंद्रात एकच सरकार आहे त्यांनी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा वाढवावी,’ अशी मागणी करतानाच अाेबीसींना साेबत घेऊन मी मराठा अारक्षणासाठी रस्त्यावर उतरेन, अशी घाेषणाही भुजबळांनी केली.


मराठा आरक्षणासाठी अाेबीसींसह रस्त्यावर-


‘मराठा आरक्षणाला माझा विरोध असल्याची प्रतिमा निर्माण केली. मंत्रिमंडळात मी कधीही विरोध केला नाही. मराठा आरक्षणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मागणे एवढेच होते, की ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका. महाराष्ट्रात, केंद्रात एकच सरकार आहे त्यांनी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा वाढवावी,’ अशी मागणी करतानाच अाेबीसींना साेबत घेऊन मी मराठा अारक्षणासाठी रस्त्यावर उतरेन, अशी घाेषणाही भुजबळांनी केली.


आणीबाणीला विरोध-

 
न्या. पी. बी. सावंत यांच्या निवेदनाचा आधार देत भुजबळ म्हणाले, ‘इंदिरा गांधींची आणीबाणी घटनेवर आधारित होती. आताची आणीबाणी एवढी भयंकर की तिला घटनेचा आधार नाही. या विरोधात एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. पक्षांतर्गत भांडणे, दुरावा दूर केला पाहिजे.’

बातम्या आणखी आहेत...