आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोटे उत्तर दिल्याने आपली संस्कृती उज्ज्वल ठरत नाही : डॉ. आ. ह. साळुंखे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सत्कार साेहळ्यात डॉ. अा.ह. साळुंखे यांची ग्रंथतुला करण्यात अाली. - Divya Marathi
सत्कार साेहळ्यात डॉ. अा.ह. साळुंखे यांची ग्रंथतुला करण्यात अाली.

पुणे- ‘इतिहासाचे पुनर्लेखन करायचे तर विधायक आणि समतोल विचारानेच करायला हवे. खोट्याला खोट्याने उत्तर दिले तर आपली संस्कृती अधिक उज्ज्वल असल्याचे सिद्ध होत नाही,’ असा उपदेश ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक, साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी दिला.  


अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल डॉ. साळुंखे यांचा सत्कार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते रविवारी पुण्यात झाला. यानंतर ते बोलत होते. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अखिल भारतीय शिवस्मारक महोत्सव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  डॉ. साळुंखे म्हणाले, ‘एक बाजू स्वैर, निराधार लिहिते म्हणून आपणही तसेच लिहिले तर त्याला अर्थ उरत नाही. इतिहासाचे पुनर्लेखन करायला हवे असे वाटत असेल तर ते न्याय्य बुद्धीनेच करायला हवे. परिवर्तन चांगल्या दिशेने करायचे तर पवित्रा बदलायला वेळ लागतोच. भारतासारख्या संमिश्र समाजात आंतरिक ऐक्य राहिले नाही तर देश एकरूप असणार नाही. म्हणून मतभेद, अनिष्ट चालीरीती दूर करताना एकमेकांना समजून घेणे, संवाद ठेवणे, आदर बाळगणे हे करायला हवे.’  


अहोरात्र कष्ट करणाऱ्या आई-वडिलांची, राबणाऱ्या भावंडांची, सर्व शिक्षकांची, वाचकांची, श्रोत्यांची आणि टीकाकारांची मला अाज आठवण होत आहे. निळू फुले आणि नागनाथअण्णा नायकवाडी यांनी जे बळ मला दिले त्याला तोड नाही, असे डॉ. साळुंखे म्हणाले.  जिज्ञासा, प्रबळ इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी आणि चिकित्सक दृष्टिकोन अंगी बाणवली पाहिजे,’ असा सल्ला त्यांनी तरुणाईला दिला.  

 

डाॅ. साळुंखेंसमाेर नतमस्तक व्हावे वाटते : शरद पवार
‘वैदिक परंपरेला विरोध आणि बहुजनांची मानसिक गुलामगिरीतून मुक्तता हे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या लेखनाचे गमक राहिले आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना साहित्य, संस्कृती क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान पाहून त्यांच्याबद्दल  अभिमानच वाटत नाही तर त्यांच्यापुढे नतमस्तक होण्याची भावना निर्माण होते,’ असे शरद पवार म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...