आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजुळेंच्या शूटिंगमुळे पुणे विद्यापीठात ‘ड्रामा’;परवानगी न घेता शासकीय जागा भाड्याने दिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी नियमबाह्य पद्धतीने मैदान भाड्याने उपलब्ध करून दिल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाला व  कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना  कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे अादेश दिले अाहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री  रवींद्र वायकर यांनी बुधवारी ही माहिती दिली. ‘सात दिवसांत विद्यापीठाने याबाबत  योग्य उत्तर किंवा कारवाई न केल्यास चित्रपटाचा सेट जप्त करा,’ असेही त्यांनी प्रशासनाला दिलेल्या अादेशात नमूद केले अाहे.   


पुण्याच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी विद्यापीठातील  वसतिगृह, मेस आणि इतर समस्या साेडवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली हाेती.   या पार्श्वभूमीवर समस्यांची पाहणी करण्यासाठी बुधवारी विद्यापीठात अाले हाेते. त्या वेळी पत्रकारांनी त्यांना मंजुळेंच्या शूटिंगबाबतही प्रश्न विचारले.    


वायकर म्हणाले, ‘विद्यापीठात आल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. विद्यापीठाने शूटिंगसाठी मैदान भाड्याने देण्याबाबत  मंजुळे यांच्यासोबत  केलेल्या कराराची मुदत ३० डिसेंबरला संपली होती. आता फेब्रुवारी महिना उजाडला अाहे. सरकारची जागा मंजुळेंना शूटिंगला देण्यासाठी विद्यापीठाने शासनाची परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र, विद्यापीठाने तसे केले नाही. त्यामुळे तातडीने कुलगुरू डॉ. करमळकर आणि संबंधित  प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे. या संपूर्ण प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने कायद्याचे उल्लंघन केले अाहे. शूटिंगसाठी स्थानिक प्रशासन, अग्निशामक दल अशा कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नाहीत. त्याबाबतही चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळले तर निश्चित कारवाई करण्यात येईल,’ असे वायकर म्हणाले. 


‘सिंहगड’वर प्रशासक येणार  
पुण्यातील सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या  कॉलेजांमधील प्राध्यापकांचे वेतन १६ महिन्यांपासून रखडले अाहे. त्यांचा प्रश्न साेडविण्यासाठी शिक्षण खात्याच्या  सर्व विभागांची लवकर एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे वायकर म्हणाले.

 

राजकीय पक्षांनाही जागा देणार का?  
कायदा हा सर्वांसाठी सारखाच असला पाहिजे. त्यामुळे विद्यापीठाने नियमानुसार शुटिंगला परवानगी द्यायला हवी हाेती. उद्या एखाद्या राजकीय पक्षाने विद्यापीठाची जागा मागितली तर तुम्ही देणार का ? विद्यापीठातील एखादा विद्यार्थी असेल तर त्यालाही तुम्ही विद्यापीठाची जागा भाडेतत्त्वावर देणार का ? कायद्याचं उल्लंघन हाेणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यावी.
- रवींद्र वायकर, राज्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण 

बातम्या आणखी आहेत...