आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक जिंकण्यासाठी भाजपानेच कोरेगावची दंगल घडवली;माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा अाराेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- “विरोधी मतांमध्ये विभाजन केल्याशिवाय २०१९ मध्ये निवडणूक जिंकता येणार नाही, याची जाणीव भाजपला झाली आहे. त्यामुळे समाजात फूट पाडण्यासाठी, जातीय तणाव, वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असावा,’ असा अाराेप  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला अाहे. म्हणूनच या दंगलीमागचे सूत्रधार समोर आले पाहिजेत,’ अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.  “समाजात फूट पाडण्यात मुखमंत्र्यांना कदाचित यश आले असेल मात्र राज्याचा संवैधानिक प्रमुख म्हणून ते अपयशी ठरले आहेत,” असा आरोपही त्यांनी केला.  


चव्हाण म्हणाले, की २०१४ मध्ये भाजपला देशात ३१ टक्के मते मिळाली होती. त्यांच्या विरोधातील ६९ टक्के मते एकत्र राहिली तर २०१९ मध्ये भाजप जिंकू शकणार नाही. याची झलक गुजरात निवडणुकीतच दिसली. म्हणून विविध समाज घटकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होतो आहे. हे समजण्यासाठी फार राज्यशास्त्र येण्याची गरज नाही.  दर वर्षी १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे लोक येतात. यंदा २०० वर्षे पूर्ण होत असल्याने लाखो लोक येणार, याची सरकारला माहिती होती. त्यादृष्टीने नियोजन करणे गरजेचे होते. तेथील दंगलीचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. त्यावरून पहिला दगड कोणी फेकला, पहिली ठिणगी कोणी टाकली यामागचा सूत्रधार सरकारने शोधावा’, असे ते म्हणाले. 


दोन्ही काँग्रेसला पुन्हा एकत्र यावेच लागेल
“विविध तपास यंत्रणांना वापरून सरकार विरोधी नेत्यांवर दबाव टाकत आहे. या माध्यमातून या नेत्यांना सरकारच्या मनाप्रमाणे वागण्यास भाग पाडले जात आहे. निवडणुका जवळ येतील तसे  सामाजिक समीकरणे बदलवण्यासाठी ‘कोरेगाव भीमा’ सारखे प्रकार वारंवार घडवले जातील. त्याशिवाय निवडणूक एकतर्फी होणार नाही,” असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. सत्ताधाऱ्यांचा हा डाव उधळून लावण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांना आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे लागेल, असेही चव्हाण म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...