आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमातील हिंसाचार जातीय नव्हे, नक्षलवाद्यांचा कट; समितीचा निष्कर्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने प्रस्थापित केलेल्या सर्व संस्था मोडून काढण्याचा किंवा त्यांची विश्वासार्हता धोक्यात आणण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न आहे. याचसाठी डॉ. आंबेडकरांचे नाव घेऊन सशस्त्र क्रांतीचे आवाहन केले जात आहे. कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार हा नक्षलवाद्यांच्याच पूर्वनियोजित कटाचा भाग होता. ही दंगल कोणत्याही हिंदुत्ववादी व आंबेडकरी गटांनी घडवल्याचे दिसून येत नाही, असा निष्कर्ष विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीने मांडला आहे.   


समितीच्या मते, स्थानिक पोलिसांनी पुरेशी सतर्कता न दाखवल्याने हिंसाचार भडकला. ३१ डिसेंबरला शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात सहभागी कबीर कला मंच, रिपब्लिकन पँथर या संशयित नक्षलवादी गटांची चौकशी झाली पाहिजे. हे गट गेल्या ३-४ वर्षांपासून कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त प्रक्षोभक मांडणी करून जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. बामसेफ, संभाजी ब्रिगेड या संघटनांची कृत्येही आक्षेपार्ह आहेत. वढू बुद्रुक ग्रामपंचायतीने ३० डिसेंबरला पोलिसांना दिलेल्या पत्रात बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा या संघटनांचा उल्लेख करून संभाजी महाराज समाधिस्थळी नुकसान, इजा होण्याचा धोका व्यक्त केला होता, असे समितीने म्हटले आहे. 

 
अशी आहे सत्यशोधन समिती

 माजी लष्करी अधिकारी कॅप्टन स्मिता गायकवाड, लोकशाही जागर मंचाचे सागर शिंदे, पुणे बार असोसिएशनचे माजी सचिव अॅड. सत्यजित तुपे, मातंग क्रांती सेनेचे प्रा. सुभाष खिल्लारे, मराठा युवा संघटनेचे दत्ता शिर्के, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पवार यांनी एकत्र येऊन तीन महिने वढू, कोरेगाव भीमा परिसरातील शेकडो लोकांशी चर्चा करून हा अहवाल तयार केला आहे. भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांच्या विवेक विचार मंचातर्फे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून तो मुख्यमंत्र्यांना दिला जाणार आहे. 

 

फलकच ठरला वादाचे कारण 

हिंसाचाराचा घटनाक्रम पाहता २८ डिसेंबर २०१७ रोजी वढू बुद्रुक येथे ग्रामपंचायतीची परवानगी न घेता फलक लावण्यात आला. यावर वादग्रस्त आणि बिनबुडाचा इतिहास लिहिला होता. हा फलक वादाचे कारण ठरला. फलक लावणारे लोक व संघटना आणि त्यांचे फुटीरतावाद्यांशी असलेले लागेबांधे या अनुषंगाने चौकशी होण्याची गरज आहे. पोलिस पाटलाने या फलकाची माहिती पोलिसांना देऊनही ते तत्काळ घटनास्थळी गेले नाहीत. पोलिसांनी तातडीने दखल घेतली असती तर तणाव निवळला असता, असे सत्यशोधन समितीचे म्हणणे आहे.   

 

पुस्तकावर बंदी, लेेखकावर गुन्हा नोंदवा
‘शिवाजीचे उदात्तीकरण’ या पुस्तकातून राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली आहेत. कोरेगाव भीमा येथील युद्धास दोनशे वर्षे झाल्यानिमित्त बामसेफच्या विलास खरात यांनी पुस्तक लिहिले. या दोन्ही पुस्तकांमध्ये जातीय तेढ वाढवणारे भडकाऊ तसेच वादग्रस्त लेखन आहे. त्यामुळे या दोन्ही पुस्तकांवर बंदी घालून लेखक, प्रकाशकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही समितीची मागणी आहे.

 

सत्य उजेडात यावे  : समिती  
वढू बुद्रुक येथील गोविंद गोपाळ यांची कथित समाधी तसेच संभाजी महाराज अंत्यसंस्कार यासंदर्भात मराठा व महार समाजातून परस्परविरोधी भूमिका मांडल्या जातात. कोरेगाव भीमा येथील १ जानेवारी १८१८ चे युद्ध व तेथील स्मृतिस्तंभ यांचा इतिहास याबद्दलही वाद आहेत. भविष्यातही या मुद्द्यांवरून वाद संभवतो. ही शक्यता विचारात घेऊन सत्य इतिहास समजण्यासाठी राज्य शासनाने इतिहास संशोधकांची समिती नियुक्त करावी, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...