आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगदिनी पाण्याखाली योगासने करून \'खुशी\' रचणार विक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जागतिक योगदिनाच्या अनुषंगाने सोळावर्षीय खुशी परमार ही स्कूबा डायव्हर पाण्याखाली योगासने करणार आहे. यानिमित्ताने तब्बल अडीच तास पाण्याखाली योगासने करण्याचा विक्रम करण्यास ती सज्ज झाली आहे. 


पुण्याच्या डेक्कन जिमखान्यावरील टिळक तलावात खुशी हा विक्रम साकारणार आहे. बालवयापासून पोहण्याची आवड असणारी खुशी परमार उत्कृष्ट जलतरणपटू तर आहेच, पण साहसी खेळांमध्ये रमणारी असल्याने तिने स्कूबा डायव्हिंगमध्ये प्रावीण्य मिळवले आहे. एका आठवड्यात सातत्याने साडेअकरा तासांच्या डायव्हिंगचा विक्रम तिच्या नावावर आहे. ती १८ वर्षांखालील 'यंगेस्ट डायव्हर' आहे. त्याचप्रमाणे गोवा, इंडोनेशिया, मालदीव, मलेशिया आदी ठिकाणी तिने तब्बल १०१ डाइव्हज करून जागतिक पातळीवर लक्ष वेधून घेतले आहे. नुकतीच प्रथम श्रेणीत दहावी उत्तीर्ण झालेली खुशी प्रवीण रॉय, व्यंकट चार्ली (गोवा) आणि क्षितिज मित्तल अशा आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त स्कूबा डायव्हर्सचे मार्गदर्शन घेत आहे. 


असा होईल विक्रम 
- खुशी २१ जूनला सकाळी नऊ वाजता तलावात डुबकी घेईल. 
- ६ ते १० फूट खोल पाणी असेल. 
- खुशी सलग अडीच तास ३१ आसने व ध्यान करेल. 


सर्वात कमी वयाची डायव्हर ठरेल खुशी 
खुशीने यापूर्वीही विक्रम केले आहेत. २१ जूनला ती नव्या विक्रमाला गवसणी घालेल, याची मला खात्री आहे. या विक्रमामुळे ती १८ वर्षांखालील सर्वांत लहान वयाची अडीच तास पाण्याखाली साहसी कामगिरी करणारी डायव्हर ठरेल. 
-क्षितिज मित्तल, खुशीचे मार्गदर्शक 


देशातील 'स्कूबा' केंद्रे 
देशात अंदमान-निकोबार, लक्षद्वीप बेट कोकण, गोवा, पाँडिचेरी, विशाखापट्टणम, महाबलिपुरम्, ओखा (गुजरात), रत्नागिरी आणि काशीद येथे स्कूबा डायव्हिंग केंद्रे आहेत. 


डायव्हिंगच्या प्रसार, प्रचारासाठी निर्णय 
खुशी म्हणाली, 'लहानपणापासून पोहण्याची आवड होती. गोव्यात एकदा स्कूबा डायव्हिंगचा अनुभव घेतला व या खेळाच्या प्रेमात पडले. सगळे लक्ष यावरच केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. योगदिनाच्या निमित्ताने या खेळाचा प्रचार, प्रसार करण्याच्या हेतूने हा उपक्रम करण्याचा निर्णय घेतला. 

 

बातम्या आणखी आहेत...