आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस रुसला; 19 जिल्ह्यांत 25 टक्क्यांहून कमी; शेवटच्या आठवड्यात वाढण्याचा अंदाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्यात जून महिन्यात गेल्या १८ दिवसांत कुठेही आठवडाभरापेक्षा जास्त दिवस पाऊस पडलेला नाही. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अाैरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये केवळ दोनच दिवस पाऊस झाला. मान्सून मंदावल्यामुळे पाऊस जूनची सरासरी गाठणार का, हा प्रश्न आहे. जूनची राज्याची सरासरी २२३.३ मिमी अाहे, तर प्रत्यक्षात अातापर्यंत केवळ ४८.६ मिमी म्हणजेच २१.८ टक्केच पाऊस झाला अाहे.   


हमखास पावसाच्या कोकण आणि पूर्व विदर्भात अजून दमदार पावसाला सुरुवात झालेली नाही. कोकणातील ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर व विदर्भातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत जूनच्या सरासरीच्या २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला. याशिवाय कोल्हापूर, औरंगाबाद आणि खान्देशातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव यासह राज्यातल्या १९ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या २५ टक्केही पावसाची नोंद झालेली नाही. देशाच्या विविध भागातल्या हवेच्या प्रतिकूल ‘पॅटर्न’मुळे मान्सूनला खीळ बसली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊसमान वाढण्याचा अंदाज आहे. मान्सून अजून आलाच नाही; जाेहरेंचा अाराेप, अायएमडीकडून मात्र खंडन   

 

‘भारतीय हवामानशास्त्र विभागाचा (आयएमडी) अंदाज चुकला असून पूर्वमान्सून पावसालाच मान्सून पाऊस म्हटले जात आहे,’ असा आरोप भौतिकशास्त्रज्ञ किरणकुमार जोहरे यांनी केला आहे. मिनिकॉय, अमिनी, तिरुअनंतपुरम, पुनालूर, कोल्लम, अलापुझा, कोट्यम, कोची, त्रिसूर, कोझिकोडे, थलासेरी, कन्नुर, कुडुलू आणि मंगलोर या दक्षिणेतल्या वेधशाळांच्या क्षेत्रातील किमान आठ ठिकाणी सलग दोन दिवस २५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर केरळात मान्सून आल्याचे जाहीर केले जाते. जोहरे म्हणतात, ‘यंदा ‘सागर’ आणि ‘मेकुणू’ या दोन वादळांच्या प्रभावामुळे केरळात जोरदार पाऊस झाला. या पावसानंतर आयएमडीने उतावीळपणे मान्सून आगमनाची वर्दी दिली. वास्तविक हा पूर्वमान्सून पाऊस मान्सून दाखवण्याचा प्रकार होता.’ अर्थातच जोहरे यांच्या या दाव्याला हवामान खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. उर्वरित भारतात मान्सून मंदावला असला तरी केरळ, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबार बेटांवर अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस मान्सूनच्या आगमनापासून सुरू आहे. मान्सूनमधला खंडीत कालावधी ही दुर्मिळ बाब नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

महाराष्ट्र व्यापला, पण बरसेना 
७ जूनला तळकोकणात अालेला मान्सून अद्याप बरसण्यास सुरुवात झालेली नाही. खान्देशातल्या धुळे, जळगाव, नंदुरबार तसेच विदर्भातल्या बुलडाणा, अमरावतीच्या उत्तरेकडचा काही भाग वगळता संपूर्ण राज्य मान्सूनने व्यापले असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.

 

चक्राकार वाऱ्यामुळे अडथळा
यूपी, मध्य आसाम, बंगाल उपसागराच्या पश्चिम व ओडिशात समुद्रसपाटीपासून ७.६ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण कर्नाटकच्या सीमेवरील अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आहे. गोव्यापासून केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे मान्सून रखडला अाहे.

 

मान्सून म्हणजे सतत पाऊस नव्हे, खंड ही सर्वसाधारण प्रक्रिया

1 मान्सून काळात सतत पाऊस पडणे अपेक्षित नसते. मान्सूनच्या आगमनानंतरही पाऊस खंडित होणे ही सर्वसाधारण प्रक्रिया आहे. ‘अॅक्टिव्ह स्पेल’ आणि ‘ब्रेक स्पेल’ हे मान्सूनचे वैशिष्ट्य आहे. १० जूननंतर मान्सूनमध्ये खंड पडण्याचा अंदाज मान्सून मॉडेलने यापूर्वीच दिलेला होता. 

 

2 रविवारची मान्सूनरेषा ठाणे, नगर, बुलडाणा, अमरावती, गोंदिया या जिल्ह्यांमधून पुढे ओडिशा, बंगाल आदी पूर्वोत्तर राज्यांमध्ये पोचली. दरम्यान, पुढच्या आठवडाभरात मान्सूनची आगेकूच होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे मध्य भारताची प्रतीक्षा कायम आहे. 

 

3 अपुऱ्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. पहिला-दुसरा पाऊस जोरदार झालेल्या ठिकाणी दुबार पेरण्यांचेही संकट येऊ शकते. राज्याच्या कृषी आणि हवामान खात्यानेही यापूर्वीच शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस झाल्यानंतर पेरण्यांचे आवाहन केले आहे. 

 

गेल्या ४८ तासांत : पावसाने कोकणात बहुतांश ठिकाणी हजेरी तर काही गावांना झोडपून काढले. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही तुरळक पाऊस झाला. विदर्भात मात्र हवामान कोरडे होते.

 

येत्या २४ तासांत : कोकण-गाेव्यात मुसळधार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. पुढील ४ दिवसांत राज्यात पाऊस परतू शकतो.

 

बातम्या आणखी आहेत...