आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानकरांनी अाव्हान स्वीकारले; बारामतीतूनच लढणार! पक्षातील बंडखाेरांना प्रत्त्युत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘माझ्या नावावर जी काही संपत्ती दिसत आहे ते सगळे माझ्या पक्षाचे आहे. पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे केवळ ते माझ्या नावावर आहे. माझ्या चारित्र्यावर शरद पवारसुद्धा संशय घेणार नाहीत,’ या शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी पक्षातील बंडखाेरांना प्रत्युत्तर दिले. ‘रासप’चे माजी राष्ट्रीय सचिव दशरथ राऊत यांनी जानकरांवर खोटारडेपणाचे आरोप करत नव्या पक्षाची स्थापना केली हाेती. तसेच जानकरांना लाेकसभेची निवडणूक पुन्हा बारामतीमधून लढवण्याचे अाव्हान दिले हाेते, तेही अापण स्वीकारल्याचे जानकरांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.  


राऊत यांच्यावर टीका करताना जानकर म्हणाले, ‘त्यांना पक्षाचे सचिव केले. पण त्यांना साधा ग्रामपंचायत सदस्य निवडून आणता आला नाही. या वैफल्यातून माझ्यावर त्यांनी टीका सुरू केली आहे. त्याची दखल घेण्याची गरज मला वाटत नाही. माझे स्वतःचे काही नाही. पक्षासाठी, समाजासाठी मी अविवाहित राहिलो. माझ्या कुठल्या नातेवाइकांना, भावाला, पुतण्याला मी पक्षात स्थान दिले नाही. कोणाच्या बदल्या- नियुक्त्यांमध्ये मी पडत नाही. राऊतांनी माझ्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे.’ ‘राऊत हे स्वतः ग्रामपंचायतीलासुद्धा निवडून येऊ शकत नाहीत. त्यांच्या बारामतीमध्येच मला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी मतदान झाले. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणूक लढवत असताना जे त्याला मते मिळवून देऊ शकले नाहीत, त्यांना मी महत्त्व देऊ इच्छित नाही. माझ्या पक्षाचे ९३ सदस्य विविध निवडणुकांत देशभरात निवडून आले आहेत. आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, आसाम अशा २६ राज्यांमध्ये मी पक्ष पोचवला आहे. यापुढेही जातीय, भावनिक राजकारण न करता काम करत राहीन’, असे जानकरांनी स्पष्ट केले. 

 

बारामती मतदारसंघात माझा नियमित संपर्क  
“माझ्यात हिंमत आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक मी बारामतीतूनच लढणार. त्यासाठी माझे नियोजनबद्ध काम चालू आहे. दर आठ दिवसाला मी बारामतीत असतो. संपूर्ण मतदारसंघात माझा नियमित संपर्क आहे. मंत्रिपदाच्या माध्यमातून केंद्राच्या, राज्याच्या विकास योजना मी मतदारांपर्यंत पोचवतो आहे,’ असे महादेव जानकरांनी स्पष्ट केले.   


‘भावाच्या हिताचेही काम करत नाही’  
‘रासपचा अध्यक्ष म्हणून मी सरकारमध्ये नाही. राज्याचा मंत्री म्हणून काम करतो आहे. माझ्या खात्याला आयएसओ नामांकन मिळाले आहे. मी स्वच्छ आणि लोकहिताचाच कारभार करणार. वैयक्तिक हिताची कामे मी करत नाही. माझ्या सख्ख्या भावाचेसुद्धा मी काम करत नाही. त्यातून काहींची नाराजी असू शकते. पण अशा नाराजांनी पक्षासाठी काय केले याचा विचार करावा,’ असे जानकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...