आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीच्या अभिजात दर्जासाठी आता मोदींची सही घ्यावी; राजमाता शुभांगिनीदेवींना साकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पंतप्रधान मोदी जेव्हा बडोदा मतदारसंघातून निवडणूक लढणार होते, तेव्हा त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून आपण स्वाक्षरी केली होती. आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान बडोद्याला मिळाला आहे. तेव्हा बडोदा आणि मराठी यांचे नाते लक्षात घेऊन आपण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान मोदी यांची स्वाक्षरी घ्यावी..असे मजेदार साकडे मराठी मंडळींनी शनिवारी बडोद्याच्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा राजमाता शुभांगिनीदेवी यांना घातले, तेव्हा उपस्थितांमध्ये खसखस  पिकली आणि राजमातांनाही हसू आवरणे अवघड झाले.    


निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या  राजमाता शुभांगिनीदेवी यांच्या सत्काराचे आणि स्वागताचे..राजमातांचा सत्कार पिंपरी- चिंचवड येथील संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर मसापचे पदाधिकारी डॉ. शिवाजीराव कदम, प्रा. मिलिंद जोशी, उल्हासदादा पवार, बडोदा येथील आयोजक  संस्थेचे दिलीप खोपकर, प्रकाश पायगुडे उपस्थित होते.    


बडोद्यात आणि एकूण गुजरातमध्ये मराठी मंडळी खूप मोठ्या संख्येने आहेत. प्रदीर्घ काळापासून वास्तव्य करून आहेत. त्यांनी महाराष्ट्रापासून दूर असूनही आपली अस्मिता जपली आहे. बडोद्याला खूप काळानंतर मराठी साहित्य संमेलन होत आहे, याचा आनंद आहे. इथून येणाऱ्या मराठी मंडळींचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे राजमाता शुभांगिनीदेवी यांनी सांगितले.    

 

स्वागताध्यक्षांची मांदियाळी   
पुण्यातील संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सतीश देसाई, सासवडचे स्वागताध्यक्ष विजय कोलते, पिंपरी चिंचवडचे स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील आणि आगामी संमेलनाच्या स्वागताध्यक्ष शुभांगिनीदेवी..अशी स्वागताध्यक्षांची मांदियाळीच शनिवारी सभागृहात उपस्थित होती. शिवाय लेखक डॉ. न. म. जोशी, भारत सासणे, अरुण खोरे हेही उपस्थित होते.  

बातम्या आणखी आहेत...