आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलनाध्यक्षांच्या विधानातील ‘राजा’ हा शब्द प्रतीकात्मक; मंत्री मुनगंटीवार यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘राजा तू चुकतो आहेस, सुधारलं पाहिजेस’ या साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या विधानातील ‘राजा’ हा शब्द प्रतीकात्मक आहे. त्यांचे हे विधान म्हणजे सरकार किंवा कोणत्या पक्षावर टीका नाही, असे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.   


बडोदा येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातील देशमुख यांनी ‘राजा, तू चुकतो आहेस, सुधारलं पाहिजेस,’ असे राज्यकर्त्यांना उद्देशून विधान केले हाेते. त्याविषयी विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, ‘राज्यकर्त्यांनी दलित, आदिवासी, शोषित आणि पीडित वर्गाकडे लक्ष देताना त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करावी, असे देशमुख यांना म्हणायचे आहे. ही त्यांची अपेक्षा आहे आणि त्यात काही गैर नाही. मात्र, त्यांचे हे विधान म्हणजे सरकार किंवा कोणत्या पक्षावर टीका आहे, असे समजण्याचे कारण नाही.’  


शेतकऱ्यांच्या  अपेक्षांची पूर्ती होत नसल्यामुळे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत यांच्या गाडीवर दगडफेक झाली, याबाबत पत्रकारांनी विचारले असता मुनगंटीवार यांनी ‘शेतकरी संघटनेने जे हल्ले केले ते काँग्रेसच्या काळातही होत होते. राज्यात इतकी वर्षे ‘जाणता राजा’च्या पक्षाचे सरकार होते. त्या काळात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक झाल्या. आमच्या सरकारने कृषी विभागाची तरतूद वाढवली असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात सरकार गंभीर आहे. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करून अर्थसंकल्प सादर केला जाईल. कोणत्याही समाजघटकावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली गेली आहे,’ असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.


‘त्या दाेघांनी’ अाता मुलाखतच घेत राहावे  
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेले उत्तर याविषयी विचारले असता ‘त्यांनी पुढची ५० वर्षे एकमेकांची मुलाखत घेत राहावे आणि आम्हाला राज्य करू द्यावे,’ अशा मिश्कील  शैलीत मुनगंटीवार यांनी उत्तर दिले.

बातम्या आणखी आहेत...