आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना ध्वनिचित्रफीत पाठवून एकाची आत्महत्या; मदरशाच्या माहितीवरुन वाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती- आरोपींचा चिठ्ठीत नामोल्लेख करून मोबाइलवर व्हिडिओ बनवून तो मित्र, नातेवाईक आणि पोलिस अधिकाऱ्यांना पाठवून दौंड येथील एकाने गुरुवारी आत्महत्या केली. निसार जब्बार शेख (४६, रा. कुंभार गल्ली, दौंड) असे मृताचे नाव आहे. दौंड येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक वसीम शेख, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान तसेच एका मौलानावर त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.


आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि कट रचल्याप्रकरणी हाजी ताहेर खान, हाजी युसूफ खान, हाजी सोहेल खान, हाजी नासीर खान, हाजी शफीउल्लाह खान, हाजी अहमद खान (पठाण), फिरोज शफीउल्लाह खान (पठाण), मौलाना अब्दुल रशीद रज्जाक, इस्माईल इब्राहिम शेख, वसीम इस्माईल शेख, शेख दस्तगीर हाजी कादर शेख, उबेद बाबूमियाँ खान, तजमुल्ल काझी (टी.के.) व अखलाख रहीम खान (सर्व रा. दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.   आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेहाचे दफन न करण्याची भूमिका काही नातेवाइकांनी घेतल्याने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते.  


मृताच्या पत्नीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, दौंड शहरात गोपाळवाडी रस्ता तसेच लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीत दोन मदरसे सुरू आहेत. तेथेच मदरसा इमदादुल उलूम युसुफिया माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे. प्रत्यक्षात कागदोपत्री या संस्थांचा पत्ता हेच विश्वस्तांचे निवासस्थान असल्याच्या संशयातून निसार जब्बार शेख यांनी माहिती अधिकारात या संस्थेची संपूर्ण माहिती मिळवली होती. मात्र, ती चुकीची व बनावट असल्याचा शेख यांचा दावा होता. तसेच माहिती मागितल्यामुळे आरोपी हे निसार शेख यांना सतत खूप त्रास देत होते. याबाबत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे दाखल तक्रारीची चौकशीही  सुरू होती. अशातच शेख यांनी गुरुवारी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वीच बारामती तालुक्यातील १९ वर्षीय तरुणाने बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांची भीती दाखवल्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेच्या चौकशीची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...