आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUNE: निर्णय घेणारे वर बसलेत, आपण जेवू-खाऊ अन‌् गप्पा मारू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार असल्याचे निश्चित असले तरी जागावाटपाच्या निर्णय प्रक्रियेत स्थानिक नेत्यांना अजिबात स्थान नसेल,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सूचित केले.   


‘काँग्रेसकडे असणारी पुणे लोकसभेची जागा आम्ही लढवू.’ ‘काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघ राष्ट्रवादीला न मिळाल्यास आघाडी तुटू शकते.’ ‘काँग्रेसला राज्यात पडती भूमिका घ्यावीच लागेल,’ अशा प्रकारची काँग्रेसला दमात घेणारी वक्तव्ये अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यामुळे ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे पाहून अजित पवारांनी आता भाषा बदलली.  


शिवसेना- भाजपच्या संभाव्य जागावाटपाबद्दल माहिती तुम्ही ठेवता, परंतु ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या जागावाटपाचे काय? प्रसंगी लोकसभेला काँग्रेसला जास्त जागा देऊन विधानसभेच्या अधिकच्या जागा मिळवण्याचा प्रयत्न ‘राष्ट्रवादी’ने आतापासून चालवलेला दिसतो, या ‘दिव्य मराठी’च्या प्रश्नावर अजित पवार उत्तरले, “ताजा अनुभव तुम्हाला सांगतो. पालघर निवडणुकीतील उमेदवाराची चर्चा करण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी बैठक घेतली. आमच्याकडून मी, जयंत पाटील, धनंजय मुंडे आदी होतो.

 

काँग्रेसकडून विखे पाटील, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण वगैरे मंडळी होती. थोडीफार चर्चा आम्ही केली. त्यानंतर मीच म्हणालो, आपण छान गप्पा मारू. जेवू आणि निघू. आपण कितीही काही म्हटलं तरी आपल्याला अधिकार नाहीत. कशाला वेळ घालवायचा? निर्णय घेणारे वर बसलेत. पवार साहेब आणि राहुल गांधी काय करायचे ते ठरवतील. त्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवलो आणि निघालो,’ असे अजितदादांनी स्पष्ट सांगितले. दरम्यान, भाजप-शिवसेना वेगळे लढले की त्यांचा पत्ता कट होणार हे सांगायला कोणाची गरज नाही,’ याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.  

 

‘भावी मुख्यमंत्री’ म्हणू नका  

कार्यकर्ते अति उत्साहात ‘भावी मुख्यमंत्री’ असा माझा उल्लेख करतात, तो बरोबर नाही. “१४५ ची मॅजिक फिगर आधी गाठावी लागते. कर्नाटकात काय झाले आपण बघितले. नुसत्या आमदार संख्येवरही काही नसते. आमच्यात आम्ही काही ठरवले तरी आमचे सगळे ‘वर’ ठरते,’ असे शरद पवारांचे नाव न घेता ते म्हणाले. २००४ मध्ये आमची आमदार संख्या जास्त असूनही मुख्यमंत्रिपद आम्ही घेतले नाही,’ याची आठवण अजितदादांनी करून दिली.   

 

बाळासाहेब असते तर धाडस झाले नसते   
‘भाजपने जेवढे दाबता येईल तेवढे शिवसेनेला दाबले. बाळासाहेबांच्या काळात असे धाडस झाले नसते. आता शिवसेनेची पाळी आहे. ते कसा बदला घेतात पाहू,’ असे सांगत अजित पवारांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. पूर्वी लोकसभेच्या जास्त जागा भाजपला देऊन विधानसभेच्या जास्त जागा शिवसेना लढवत असे. शिवसेना १७१ आणि भाजप ११७ असे त्यांचे जागावाटप असे. या वेळी भाजपचे १२२ आमदार निवडून आलेत. त्यामुळे शिवसेना त्यांना नमवेल. 

बातम्या आणखी आहेत...