आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव की राज... या प्रश्नावर शरद पवारांचा काैल ‘ठाकरे कुटुंबियांना’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- गेली ५० वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार अाणि अापल्या राेखठाेक वक्तव्याने लाेकप्रिय असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दाेन नेत्यांमधील प्रश्नाेत्तराच्या रूपातील संवादाची पर्वणीच बुधवारी संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली. निमित्त होते जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित मुलाखतीचे.... राज यांनी काही प्रश्नांची ‘गुगली’ टाकून पवारांची विकेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तितक्याच सावधपणे पवारांनी कधी डिफेन्स करून तर कधी ‘टाेलेबाजी’ करून या प्रश्नांना उत्तरे दिली. ‘राज आणि उद्धव यातल्या कोणाला निवडाल,’ या प्रश्नावर ‘ठाकरे कुटुंबीय’ असे दिलेले उत्तर पवारांच्या चाणाक्षपणाची साक्षच देऊन गेले.


एका राजकीय पक्षाचा प्रश्न विचारणारा अध्यक्ष आणि त्याला उत्तरे देणारा दुसऱ्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष अशी अनोखी मुलाखत देशात बहुधा प्रथमच नोंदली गेली. ‘यापूर्वी कधी कोणत्या सभेला, भाषणाला आले नाही तितके प्रेशर आज पवारांची मुलाखत घेताना आले आहे,’ अशी कबुली पवारांपेक्षा २७ वर्षांनी लहान असलेल्या राज यांनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच दिली. असा प्रकार यापूर्वी मी कधी केला नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची रायगडावर मुलाखत घेतली होती. पण आम्ही दोघेच होतो. एवढ्या मोठ्या गर्दीसमोर, खुल्या मैदानात अशी मुलाखत कधी झाली नसेल, असे राज म्हणाले. पुण्याच्या ज्या बृहन्महाराष्ट्र कॉमर्स महाविद्यालयात पवारांनी सहा वर्षे शिक्षण घेतले त्याच महाविद्यालयाच्या पटांगणात पवार-ठाकरे सामना रंगला.  
‘माझे वडील, काका यांच्या पिढीचा देशाला माहिती असलेला महाराष्ट्रातला शेवटचा नेता म्हणजे पवार. महाराष्ट्राला पडलेले प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. त्याची दिलखुलास उत्तरे ते देतील अशी मला खात्री आहे,’ अशी सुरुवात करून राज यांनी उत्सुकता वाढवली. रवींद्रनाथ टागोर म्हटले की बंगाल एकत्र होतो. गुरुनानकांचे नाव आले की पंजाब एकत्र होतो. याच पद्धतीने महाराष्ट्राला एका धाग्यात बांधणारा कोण, असा सवाल राज यांनी केला. त्यावर क्षणार्धात पवारांचे उत्तर आले, ‘छत्रपती शिवाजी महाराज. त्यावर तितक्याच तत्परतेने राज यांचा पुढचा प्रश्न आला, ‘मग तुम्ही दरवेळी भाषणात शाहू- फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे का म्हणता? फक्त छत्रपती शिवाजींचा महाराष्ट्र असे का म्हणत नाही?’या प्रश्नावर पवार क्षणभर थबकले. त्यानंतर उत्तरले, ‘महाराष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी   शाहू-फुले-आंबेडकरांनी प्रयत्न केले. जात-धर्माचा लवलेश न राहता मराठी माणूस एकत्र राहील याची काळजी शाहू-फुले-आंबेडकरानी घेतली. महाराष्ट्र मजबूत करण्याची ताकद त्यांच्या विचारांमध्ये आहे.’ पवारांचे हे उत्तर गोलमोल वाटल्याने राज यांनी ‘सर्व महापुरुषांकडे जातीच्या अंगाने पाहण्याची सवय महाराष्ट्राला लागली आहे, त्याचे काय?’ असा प्रश्न केला. त्यावर पवारांनी मराठीची व महाराष्ट्राची अस्मिता जागवली पाहिजे, असे सांगताच म्हणजे ‘मी करतोय ते बरोबर” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया राज यांच्या तोंडून उमटली. त्यावर प्रचंड हशा पिकला. ‘उद्योगांचे खासगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सरकारी नोकऱ्या फार उरलेल्या नाहीत. तरी आरक्षणाच्या मागण्या पुढे येत आहेत. तरुणांना वस्तुस्थिती कधी सांगणार?’ असा प्रश्न आला. ‘हा संवेदनशील विषय आहे. दुबळ्या लोकांना आरक्षण द्यायला कोणाचेच दुमत नाही. जातीनिहाय आरक्षणाचा विचार करू नका. आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण द्यायला हवे,’ असे पवार म्हणाले. 


तेव्हा त्यांचे बोलणे तोडत राज म्हणाले, ‘हे पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंनी मांडले. जातीला पोट असते, पण पोटाला जात लावू नका, असे ते सांगायचे.” त्यावर पवारांनी होकारार्थी मान हलवली. ‘मग सभा घेऊन हे तरुणांना सांगितले पाहिजे,’ अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली. त्यालाही पवारांनी प्रतिसाद दिला. ‘नव्या पिढीला सांगितले पाहिजे, की तुझ्यात कर्तृत्व आहे. तू उभा राहा. त्याला मदत करण्याची भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे. पायात पाय घालण्याचे उद्योग बंद केले पाहिजेत,’ असे पवार म्हणाले.

 

दिल्ली अावडे पवारांना
‘मुंबई अावडते की दिल्ली’? या प्रश्नावरही पवारांनी ‘दिल्ली’ असेच सांगितले. ‘ महाराष्ट्र व्यवस्थित ठेवायचा तर दिल्ली हातात हवी’, असा खुलासाही केला. ‘देव कधी आठवला का’, या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘पंढरीत विठ्ठल दर्शन घेतल्यावर समाधान मिळते. तुळजाभवानी, अंबाबाई ही  ठिकाणेही मानसिक शांती देणारी आहेत. पण देवामुळे काही होते असे मी मानत नाही. आपल्यालाच कष्ट करावे लागतात.’

 

चंद्रकांत खैरेंचा उल्लेख
जातीपातीच्या विषयावर बाेलताना पवारांनी बाळासाहेब ठाकरेंची अाठवण काढली. ‘बाळासाहेबांनी राजकारण करत असतानाही कधी जात पाहिली नाही. अाैरंगाबादचेच उदाहरण घ्या. ज्या चंद्रकांत खैरे यांच्या समाजाची त्यांच्या मतदारसंघात पाच हजार मतेही नाहीत, अशा व्यक्तीला बाळासाहेबांनी पाच वेळा निवडून अाणले, एकदा मंत्रीही केले. जाती- धर्माच्या पलीकडे पाहून त्यांनी खैरेंकडे पाहिले.’

 

माेदींमध्ये प्रचंड कष्ट करण्याची तयारी, मात्र ‘टीमवर्क’चा अभाव

- राज : मोदींबद्दलचे कालचे व अाजचे मत काय?
पवार : प्रचंड कष्ट करण्याची तयारी ही मोदींची जमेची बाजू आहे. ते खूप मेहनती आहेत. जास्तीत जास्त वेळ काम करतात. गुजरातेत याचा त्यांना फायदा झाला. पण राज्य चालवणे आणि भारत चालवणे यात फरक आहे. देश चालवायला ‘टीम’ लागते. ‘टीम’ म्हणून काम करण्याची त्यांची भूमिका दिसत नाही. त्यांना व्यापकता दाखवावी लागेल. एखादा कोणी देशात आला की दोन गोष्टी होतात. एक म्हणजे मिठी मारली जाईल आणि दुसरे म्हणजे त्यांना अहमदाबादला नेण्यात येईल. गुजरातचा अभिमान जरुर ठेव, पण देशाचे नेतृृत्व करत असल्याचेही भान ठेवा.
राज : यशवंतरावांच्या पिढीचे राजकारण मूल्याधिष्ठित होते. तसे आज दिसत नाही.
पवार : ही गोष्ट खरी आहे. नेहरूंना फार लांबून, थोडा काळ पाहिले. लालबहादूर शास्त्रींच्या वेळी मी पक्षातच होतो. यशवंतराव तर आमच्या पिढीचे आदर्शच. समाजकारणात, राजकारणात कुठेही जा पण ज्यांनी योगदान दिले त्यांना कधी विसरू नका, हा सल्ला ते देत. सभ्यतेची चौकट त्यांनी कधी मोडली नाही. अलीकडे व्यक्तिगत हल्ले होतात. आपण कोणत्या पदावर आहोत, याचे स्मरण अनेकांना होत नाही. पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराची भाषणे सुरू होती. त्या वेळी गांधी कुटुंबावर झालेला हल्ला माझ्या चौकटीत बसणारा नाही. देशाला बाराव्या शतकात लोकशाही मिळाल्याचा उल्लेख झाला. वाजपेयींना मी जवळून पाहिले. प्रत्येकाचा सन्मान कसा करावा, अतिरेकी भूमिका कशी घेऊ नये याचा आदर्श त्यांनी ठेवला. आज या सगळ्या गोष्टी आटल्यासारख्या वाटत आहेत.
राज : राहुल गांधींबद्दल काय वाटते ?
पवार : जुनी कॉंग्रेस प्रत्येक तालुक्यात होती. आज अनेक जिल्ह्यात कॉंग्रेस दुबळी आहे. कित्येक राज्यात कॉंग्रेस नाही. नेतृत्व करणाऱ्यांपुढे हे आव्हान आहे. राहुल गांधी यांच्यात फिरण्याची, विषय समजून घेण्याची, शिकण्याची तयारी असल्याचे मला दिसते. संवाद साधण्याच्या नादाला ते लागले आहेत. यात सातत्य राहिल्यास कदाचित चांगले दिवस असतील. देशाच्या दृष्टीने भाजपसमोर एक मजबूत पक्ष असणे आवश्यक आहे; आणि आमच्या छोट्या पक्षांची ती ताकद नाही, हे मान्य केले पाहिजे. मुंबईला महाराष्ट्रापासून कधीच ताेडता येणार नाही
राज :  मुंबई-बडोदा २२ हजार कोटींचा महामार्ग, मुंबई-अहमदाबाद कोटींची बुलेट ट्रेन हे कशाला? एवढ्या वेगात अहमदाबादला पोचून तिथे काय ढोकळा- फापडा खायचा का? मुंबईला महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचे हे षड््यंत्र आहे?
पवार :  बुलेट ट्रेनला मी विरोध केला नाही. पण करायची तर मुंबई-दिल्ली किंवा नागपूर-मुंबई करा, असे आम्ही म्हटले. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अहमदाबादला मुंबईतून कोणी जाणार नाही. तिकडून इकडे येतील. कारण नसताना हा उद्योग सुरू आहे. परंतु, वरुन कोणी खाली आले तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही. मुंबईला कोणी हलवू शकत नाही. तुम्ही काय गप्प बसाल का?

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, सुप्रिया सुळे यांनी मोबाईलवर घेतला मुलाखतीच्या कार्यक्रमाचा अास्वाद... 

बातम्या आणखी आहेत...