आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात माणसागणिक वाहन; मोकळा श्वास घेता यावा म्हणून आता शेअरिंग सायकली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सायकलींचे शहर अाेळख असलेल्या पुण्यात काही वर्षांत वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली. इतकी की पुण्यात मार्चपर्यंत प्रतिमाणशी एक वाहन होते. आकडा होता तब्बल ३३ लाख ३७,३७० वाहने. प्रदूषणाने गुदमरणाऱ्या पुणेकरांसाठी ‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत सार्वजनिक सायकल शेअरिंग सेवा सुरू झाली आहे. पहिल्या ६ दिवसांत साडेपाच हजारांवर पुणेकरांनी लाभ घेतला. या अत्याधुनिक सायकली अर्ध्या तासासाठी अवघ्या १ रुपये शुल्कात चालवायला मिळत आहेत. आठवड्यापूर्वी पुणे विद्यापीठात उपक्रमाचे उद््घाटन झाले. सध्या पुणे विद्यापीठ व औंधमध्ये सार्वजनिक सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

 

सायकल हेच हक्काचे वाहन
‘स्मार्ट सिटी’चे सीईओ डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, पुणेकर म्हणून २५-३० वर्षांत शहरातील वाहतुकीतील बदल जवळून पाहतोय. सायकल हेच आपले हक्काचे वाहन आहे, ही भावना आता पुन्हा एकदा पुणेकरांमध्ये जागृत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे डाॅ. जगताप म्हणाले. 

 

अशी मिळते सार्वजनिक शेअरिंग सायकल

> १०० सायकली सध्या आहेत
औंध परिसरात २०० आणि पुणे विद्यापीठात १०० सायकली सध्या प्रायोगिक तत्त्वावर ठेवण्यात आल्या आहेत. या सार्वजनिक सायकली वापरण्यासाठी अर्ध्या तासासाठी केवळ एक रुपये भाडे आकारण्यात येत आहे.   


> अॅपद्वारे बुक, कार्डने पेमेंट
मोबाइलवर एक अॅप डाऊनलोड करून नोंदणी करावी लागते. याच अॅपद्वारे परिसरातील सायकलींची उपलब्धता समजते. नेट बँकिंग, कार्ड किंवा पेटीएमच्या माध्यमातून भाडे भरता येते.  


> सायकलची चोरी अशक्य
प्रत्येक सायकलीला बारकोड आहे. तो मोबाइलने स्कॅन केल्याशिवाय सायकलचे कुलूप व ती स्टँडवरून काढता येत नाही. सायकलला जीपीएस असल्याने लोकेशन समजते. त्यामुळे सायकल कुठेही सोडली तरी हरवत नाही. 

 

पुण्यात वर्षाला २.७० लाख वाहनांची भर ३३ लाख ३७,३७० वाहने
- पुणे मनपाने जुलैत महापालिकेत सादर केलेल्या माहितीनुसार मार्च २०१७ पर्यंत शहरात तब्बल  ३३ लाख ३७ हजार ३७० वाहने होती.
- मार्च २०१६-१७ या एका वर्षात २.७० लाख वाहनांची भर पडली.
- म्हणजे शहरात दररोज ७२७ वाहने खरेदी केली जातात.

बातम्या आणखी आहेत...