आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाच्या संस्थेची पुस्तके जादा दराने घेतली; विनोद तावडेंवर राधाकृष्ण विखे यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अवांतर वाचनासाठी निश्चित केलेल्या पुस्तक खरेदीत शालेय शिक्षण विभागाने मोठा घोटाळा केल्याचा आरोप करत  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित ‘भारतीय विचार साधना’ प्रकाशनाचे २० रुपयांचे पुस्तक सरकारने ५० रुपयांना विकत घेतले. या प्रकाशनाकडून ८ कोटी १७ लाख रुपयांची खरेदी केल्याचा आरोप विखे यांनी मंगळवारी पुण्यात बाेलताना केला.  


पुण्याच्या ‘भारतीय विचार साधना’ प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात ‘बाळ नचिकेत’, ‘महर्षी अत्री’ ही पुस्तके प्रत्येकी वीस रुपयांना मिळतात. सरकारने हीच पुस्तके प्रती ५० रुपयांना एक प्रत या दराने खरेदी केली आहेत. संघाशी संबंधित संस्थेवर सरकारची मेहरबानी का, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. त्यांनी सांगितले की, पुस्तक खरेदीची निविदा जुलैमध्ये काढण्यात आली. सप्टेंबरमध्ये पुस्तकांची यादी जाहीर झाली. मात्र निविदा प्रक्रियेत घोळ असल्याची बोंब झाल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी ही यादी रद्द केली. त्यानंतर आता १२ जानेवारीला नवी यादी जाहीर करण्यात आली. जुन्या यादीत संतकथा व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवरील पुस्तकांचा भर होता. नव्या यादीत धार्मिक व पौराणिक पुस्तकांवर भर देण्यात आला आहे. या पुस्तकातील भाषा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जाणारी आहे. या वयोगटातील मुलांना कथा समजावी यासाठी चित्रांचा वापर अधिक केला जातो.

 

पण या पुस्तकांमध्ये एक-दोन पुस्तके वगळता उर्वरित साऱ्या कथा चित्राविना आणि बोजड भाषेत लिहिलेल्या आहेत,” असे विखे-पाटील म्हणाले. काही कथा त्यांनी या वेळी वाचून दाखवल्या. विशिष्ट पौराणिक व धार्मिक कथांवर भर देऊन मुलांवर विशिष्ट विचारधारेचा संस्कार लादण्याचा सरकारचा घाट असल्याचेही ते म्हणाले.  

बातम्या आणखी आहेत...