आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुपसलेले खिळे उपसून वृक्षांच्या वेदनांना तरुणाईची फुंकर;वृक्षांनी घेतला मोकळा श्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जाहिरातींसाठी शहरांतील अनेक  वृक्षांना खिळे ठोकून, तारा जखडून, दोरखंड आवळून ‘जखमी’ करणाऱ्यांविरोधात ‘खिळेमुक्त झाडे’ हा उपक्रम तरुणाईकडून राबवला जात आहे. दिवसेंदिवस या उपक्रमाला युवा वर्गाचा प्रतिसाद वाढत असून, अनेक झाडे खिळेमुक्त  करण्यात यश मिळाले आहे. पुण्याच्या जेएम रस्त्यावरील  एका चौकात सुमारे ६० वृक्ष खिळेमुक्त करण्यात आले आहेत.    


मध्यंतरी राजकीय पक्षांच्या  कार्यकर्त्यांनी  शहरभर लावलेल्या बेकायदा  होर्डिंग्ज आणि फलकांविरोधात जोरदार मोहीम राबवण्यात आली होती. त्याची चर्चाही सर्वत्र झाली. पण निव्वळ व्यावसायिक  जाहिरातींसाठी मोजक्या संख्येनेच उरलेल्या  वृक्षांवरही कुऱ्हाडी चालविणाऱ्यांविरोधात  कुठलाही गाजावाजा न करता, कृतीनेच उत्तर देणारा ‘खिळेमुक्त  झाडे’ उपक्रम पुण्यातील वृक्षप्रेमी तरुणाईकडून राबवला जात अाहे. शहरात मोक्याच्या  ठिकाणी असणारे जुन्या वृक्षांचे अस्तित्वही जाहिरातवाल्यांना खुपू लागले आहे. या वृक्षांचे भरभक्कम बुंधे, खोडे, फांद्या यावर खिळे ठोकून, काटेरी तारा आवळून आणि दोरखंडांनी करकचून बांधून आपापले फलक, होर्डिंग्ज टांगणाऱ्यांविरोधात  ‘खिळेमुक्त  झाडे’ हा उपक्रम सध्या काम करत आहे. वृक्षांच्या बंुध्यांवर, खोडांवर, फाद्यांवर खिळे ठोकणे, तारा आवळणे यातून झाडाला थेट वर्मी दुखापत होते आणि त्यांचे आयुष्य  घटते. झाड सजीव असते, त्याला या दुखापतींमुळे वेदना होतात, हे लक्षात घेऊन ‘अंघोळीची गोळी’ या संस्थेतर्फे ‘खिळेमुक्त  झाडे’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. पुण्यातील सर्वाधिक गजबजत्या  जंगली महाराज रस्त्यावरील झाडे पहिल्या टप्प्यात खिळेमुक्त, तारामुक्त करण्यात आली, अशी माहिती संस्थेचे प्रमुख माधव पाटील यांनी दिली.    

 

जुन्या वृक्षांवर वाळवी नाशक फवारणीही   
रविवारी होणाऱ्या या उपक्रमात युवक उत्साहाने सहभागी होत आहेत. ग्रीनलाइफ व सेवक फाउंडेशनचे सहकार्यही मिळत आहे. लोक तसेच विद्यार्थ्यांकडूनही आता परिसरातील खिळे ठोकलेल्या झाडांची माहिती समजत आहे. एकदा खिळेमुक्त  केलेल्या  वृक्षावर पुन्हा खिळे ठोकले जाऊ नयेत, यासाठीही  कार्यकर्ते दक्ष असतात. खूप जुन्या वृक्षांवर वाळवी नाशक फवारणीही आम्ही करतो.    
- माधव पाटील,  प्रमुख अंघोळीची गोळी, संस्था

बातम्या आणखी आहेत...