आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाझरे धरणावर चक्राकार वावटळ, हवामानाचा अनोखा आविष्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शुक्रवारी सायंकाळी जेजुरीजवळच्या नाझरे धरणावर विदेशांत अनेकदा वैशिष्ट्यपूर्ण वातावरणीय परिस्थितीमुळे तयार होऊन घोंगावणाऱ्या चक्राकार वावटळीचा आविष्कार दिसला. सुमारे तीन मिनिटांच्या अवधीची ही वावटळ क्वचितच पाहावयास मिळते.    
जेजुरीजवळच्या रानमळा भागात काल सायंकाळी विजा कडाडल्याचा आवाज घुमला. लोकांनी आवाजाच्या दिशेने पाहिल्यावर धरणावर जमिनीच्या मोठ्या तुकड्याच्या आकाराचे वादळ घोंगावत होते. या वावटळीच्या चक्राकार गतीने धरणाचे पाणी स्वत:मध्ये खेचले आणि ऊर्ध्वगतीने फिरत ते पाणी थेट ढगांमध्ये नेले. हे दृश्य काहींनी मोबाइलमध्ये चित्रित केले आणि ते लगेच व्हायरल झाले.   

 
हवामानाच्या या आविष्काराविषयी ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले,‘शुक्रवारी राज्यभरात हवेचा दाब कमी झाला होता. जेजुरी परिसरात तो बराच कमी होता. अशा वेळी कमी दाबाच्या ठिकाणी वारे वेगाने येतात, ते बाष्प घेऊन येतात. त्यांचा वेग प्रचंड असतो आणि गती चक्राकार असते.  


कशामुळे निर्माण होते वावटळ ?   
वादळी हवामान, ढगांची उंची खूप जास्त असल्यास ढग जमिनीजवळ आले की त्यातील एक भाग खाली सरकतो, जो बाष्पयुक्त असतो.  त्या भागात वेगाने वारे फिरत असतात. त्या फिरण्याच्या तीव्रतेच्या प्रमाणात तो भाग ज्या पृष्ठभागावरून जाईल ती प्रत्येक गोष्ट तो आपल्या गतीत उचलून घेतो आणि भिरकावून देतो. या भागाच्या आतील तापमान आणि बाहेरचे तापमान यात खूप तफावत असते. त्यामुळे गती चक्राकार असली तरी दिशाहीन असते. कुठेही भरकटू शकते. अमेरिकेत तर अशा टोरनॅडोमुळे प्रचंड नुकसान होते. कालावधी काही मिनिटांपासून तासाभरापर्यंतचा असू शकतो, असेही शास्त्रज्ञांनी सांगितले.

 

घटना अनपेक्षित
कालची घटना अनपेक्षित नसली तरी या परिसरात अभावात्मक आहे. हवामानशास्त्रात याला तीव्र वावटळ म्हणतात. हवेचा दाब अचानक खूप कमी झाला तर अन्य ठिकाणांहून खूप वेगाने त्या कमी दाबाच्या ठिकाणी वारे वाहू लागतात. कमी दाबाचा परिसर आणि नव्याने आलेले बाष्पयुक्त वारे यांची घुसळण होऊन वावटळ तयार होते. तिची गती चक्राकार असते. उंच जाताना ही वावटळ त्या परिसरातील अनेक गोष्टी उचलून घेते. नाझरे धरणावर अशी वावटळ निर्माण झाल्याने वावटळीने पाणी लिफ्ट केले.
डॉ. ए. के. श्रीवास्तव, वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयएमडी

बातम्या आणखी आहेत...