आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उद्योगनगरी’च्या तिजोरीची मालकीण झाली 10 वी पास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शिक्षणाला वयाची अट नसते हे सिद्ध करत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील दोन महिलांनी आपण ‘सावित्रीच्या लेकी’ असल्याचे सिद्ध केले आहे. मनपाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा असणाऱ्या ममता गायकवाड ५५ टक्के गुण मिळवून यंदा दहावी उत्तीर्ण झाल्या आहेत, तर नगरसेविका कमल घोलप या ७२ टक्के गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झाल्या आहेत. 
आशियातील सर्वात श्रीमंत मनपा असा नावलाैकिक असलेल्या पिंपरी मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद गायकवाड यांच्याकडे असल्याने तिजाेरीच्या चाव्याही त्यांच्याकडेच अाहेत. कमल घोलप यांचे विशेष कौतुक म्हणजे त्यांनी तब्बल २१ वर्षांच्या खंडानंतर दहावी परीक्षा उत्तीर्ण होऊन जिद्दीचे दर्शन घडवले आहे.

 

शिक्षणाची आवड जोपासणाऱ्या ममता गायकवाड प्रतिकूल परिस्थिती, संसार यातून जरा मोकळ्या झाल्या आहेत. यंदा त्यांनी दहावी परीक्षेसाठी अर्ज भरला. परीक्षा सुरू असतानाच स्थायी समिती अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. महापालिकेचे काम, स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी, संसार यातून अभ्यासाला वेळ फार कमी मिळाला, पण तरीही त्यांनी ५५ टक्के गुण मिळवले.   

 

दहावी पास नसल्याचे ‘राजकीय’ भांडवल
कमल घोलप यांना कोवळ्या वयात शाळा सोडावी लागली. लग्नानंतर २ मुलांची आई झाल्यावरही शिकण्याची जिद्द टिकून होती. शाळा सोडून २१ वर्षांनी यंदा दहावीची परीक्षा दिली व ७२ टक्के गुण मिळवले. त्या निगडीतील प्रभाग क्रमांक १३ मधील भाजपच्या नगरसेविका आहेत. ‘मी दहावी पास नाही याचे विरोधकांनी भांडवल केल्याने पुन्हा जिद्द निर्माण झाली आणि रोज चार तास अभ्यास करून यश मिळवले,’ असे त्या म्हणाल्या.  

बातम्या आणखी आहेत...